वाळूज दंगलीचे खटले जलदगती न्यायालयात चालविणार : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:04 IST2018-10-10T18:03:45+5:302018-10-10T18:04:14+5:30
दंगलखोरांना लवकरात लवकर शासन व्हावे, यासाठी या दंगलीचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

वाळूज दंगलीचे खटले जलदगती न्यायालयात चालविणार : मुख्यमंत्री
औरंगाबाद : ९ आॅगस्ट रोजी वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या दंगलीतील अनेक आरोपी अजूनही जेलमध्ये आहेत. दंगलखोरांना लवकरात लवकर शासन व्हावे, यासाठी या दंगलीचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. शहरात झालेल्या विविध दंगलीची चौकशीचे काय झाले, या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात फडणवीस यांनी औरंगाबाद ग्रामीण आणि शहर पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत गुन्हे आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, सर्व पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस उपाधीक्षक आणि शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
गुन्हे आढावा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दोषसिद्धीचे प्रमाण, गुन्हे उघडीस येण्याचे प्रमाण आणि महिलाविषयक गुन्हे का वाढत आहेत, या प्रमुख मुद्यांवर आढावा घेण्यात आला. यात औरंगाबाद ग्रामीण पोलीस राज्यातील पहिल्या चारमध्ये आहेत. शहर पोलिसांची कामगिरी चांगली आहे. मात्र, त्यात अधिक चांगले काम होऊ शकते.
मोबाईल आणि दुचाकी चोऱ्यांचा तपास गांभीर्याने करा
मोबाईल, दुचाकी चोरी तक्रारदारांसाठी महत्त्वाचा विषय असतो. यामुळे अशा गुन्ह्यांचा तपास गांभीर्याने करून तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल परत कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करा. चोरट्यांना शोधून काढले पाहिजे आणि तक्रारदाराला त्याचा माल परत केला पाहिजे. फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने तपास गुणात्मक कसा होईल, यावर तपास अधिकाऱ्यांनी जोर देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.