वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 17:35 IST2025-07-26T17:32:28+5:302025-07-26T17:35:00+5:30
वाल्मीक कराड जेलमधून आजही सक्रीय; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या दाव्याने खळबळ

वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
छत्रपती संभाजीनगर: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड आणि आ.धनंजय मुंडेंचे संबंध सर्वश्रुत आहेत. कराड आजही सक्रिय आहेत. माझ्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीला कराडचा फोन आला होता, असा खळबजनक दावा विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला. याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आपण तीन महिन्यापूर्वी केल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतलेल्या बैठकीवर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पत्र पाठवून आक्षेप घेतल्याकडे लक्ष वेधले असता आ. दानवे म्हणाले की, त्याच खात्याचे मंत्री बैठक घेऊ शकतात असे नाही. काम असेल तर दुसऱ्या खात्याचे मंत्री, राज्यमंत्री देखील बैठक घेऊ शकतात. मात्र धोरण काय ते माहिती नाही. ही लोकशाहीमधील यंत्रणा आहे. याला स्वीकारली पाहिजे. दोघांनी पत्र लिहिणे हे चूक आहे. फोन करून किंवा भेटून बोलले पाहिजे होते. रेकॉर्डवर पत्र लिहिणे हे योग्य नाही असे दानेव यांनी नमूद केले.
जेलमधून कराडचा फोन
उच्च न्यायालयाने धनंजय मुंडेना कृषी साहित्य खरेदीत क्लीन चीट मिळाली आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले की, कृषिविभागात नैतिकदृष्ट्या घोटाळा झालेला आहे. आताही वाल्मीक कराड जेलमधून सर्व काही करीत आहे. माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीला जेलमधून वाल्मीक कराडचा फोन आला होता. मी हे तीन महिन्यापूर्वी सांगितले होते. चौकशी झाली पाहिजे.
लाभार्थ्यांची चौकशी करा
लाडकी बहिण योजनेत १४ हजार पुरुषांनी लाभ घेतल्याचे समजले. हे प्रकार अत्यंत गंभीर आहे. निवडणुकीच्या काळात ,निवडणुकीसाठी ही योजना आणली होती. आता हे समोर येत आहे , याची चौकशी झालीच पाहिजे.