निवडणूक आयोगाचा 'मॅपिंग' प्लॅन: २४ वर्षांनी मतदार तपासले जाणार, बीएलओ देणार ३ वेळा भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:14 IST2026-03-17T15:13:44+5:302026-03-17T15:14:41+5:30
तब्बल २४ वर्षांनंतर मतदार यादीचे पुनरीक्षण

निवडणूक आयोगाचा 'मॅपिंग' प्लॅन: २४ वर्षांनी मतदार तपासले जाणार, बीएलओ देणार ३ वेळा भेट
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ३२ लाख ६६ हजार ८८८ मतदार नोंद असलेल्या यादीचे दोन तपांनंतर म्हणजेच २४ वर्षांनी पुनरीक्षण (एसआयआर/ स्पेशल इन्सेन्टिव्ह रिव्ह्यू) कार्यक्रम पुढच्या महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत वर्तविली. उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांची उपस्थिती होती. साधारणत: तीन महिने हा कार्यक्रम चालेल. १२ राज्यांत हा कार्यक्रम राबविण्यात येईल.
स्वामी यांनी सांगितले, इन्युमरेशन फाॅर्म प्रत्येक मतदारास बीएलओमार्फत देण्यात येईल. त्यात मतदारांना स्वत:चा फोटो लावावा लागेल. क्युआरकोडसह तो फाॅर्म असेल. त्यातील भरलेली माहिती एआरओ तपासून तो फाॅर्म मंजूर करतील, अशी ही प्रक्रिया आहे. यात सद्य:स्थितीत मतदार कोण आहेत, त्यांच्या निकटच्या नात्यातील मतदार कोण आहेत, हे तपासण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेपूर्वी राजकीय पक्ष प्रतिनिधींची प्रशासनाने बैठक घेतली.
प्रत्येक घरी बीएलओ भेट देणार
प्रत्येक घरी बीएलओ भेट देतील. पाच प्रकारच्या टप्प्यांवर मतदारांचे परीक्षण केले जाईल. १३ प्रकारच्या पुराव्यांपैकी एक पुरावा इन्युमरेशन फाॅर्मसोबत द्यावा लागेल. प्रशासनाकडून चार हजार बीएलओ असतील तर राजकीय पक्षांचे बीएलए यामध्ये सहकार्य करू शकतील. १०० ते १५० घरांची जबाबदारी एका बीएलओवर असणार आहे. या प्रक्रियेत तीन वेळा बीएलओ मतदारांच्या घरी भेटी देतील. त्यानंतरही मतदार उपलब्ध झाले नाहीत तर त्यांचे नाव यादीत येणार नाही. त्या मतदारांना सुनावणीत दाद मागता येईल.
एसआयआरची गरज का आहे ?
मतदार यादी अद्ययावत करणे, ही प्रक्रिया आहे. राजकीय पक्षांनीदेखील मतदार यादीच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यामुळे एसआयआर कार्यक्रम राबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मतदारांनी बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन कटके यांनी केले.
जिल्ह्यातील किती मतदारांचे पुनरीक्षण ? ३२ लाख ६६ हजार ८८८
किती मतदान केंद्रनिहाय काम ? ३ हजार २६४
किती बीएलओ काम करणार ? ४ हजार