लग्नात व्हीआयपी पाहुणे, शासकीय नोकरीसाठी तोतया अधिकाऱ्यांची टोळी मोजायची लाखो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:23 IST2025-12-10T12:22:30+5:302025-12-10T12:23:53+5:30
कल्पनाचा प्रियकर अशरफने व्यवहार सांभाळल्याचे निष्पन्न : अशरफ, तोतया ओएसडी डिम्पीसह दत्तात्रय शेटेच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ

लग्नात व्हीआयपी पाहुणे, शासकीय नोकरीसाठी तोतया अधिकाऱ्यांची टोळी मोजायची लाखो रुपये
छत्रपती संभाजीनगर : नामांकित पुरस्कार, शासकीय नोकऱ्यांसह तोतया आयएएस, ओएसडींची टोळी बड्या लोकांच्या लग्नात व्हीआयपी पाहुणे आणण्यासाठी लाखो रुपये मोजत होती. तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवतचा प्रियकर मोहम्मद अशरफ गिल, तोतया ओएसडी डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई व श्रीगोंद्याचा जमीन व्यावसायिक दत्तात्रय शेटे यांच्या चौकशीत ही बाब उघडकीस आली असून, यासाठी पैसे घेतल्याचे बँक व्यवहारात निष्पन्न झाले.
शहरातील महिला तोतया आयएएस अधिकारी कल्पना न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र अशरफ, डिम्पी पोलिस कोठडीत होते. त्यांच्यासोबत शनिवारी अटक केलेला शेटे पोलिस कोठडीत होता. मंगळवारी तिघांच्या पोलिस कोठडीचा कालावधी संपला. त्यानंतर तपास पथकाने तिघांना दुपारी न्यायालयात हजर केले. यात अशरफ व डिम्पीच्या बँक व्यवहारातून आणखी व्यवहार समजले असून, पैसे दिलेल्यांना साक्षीदार करण्यात आले आहे. त्यांच्याकडून या टोळीने विविध कारणांनी पैसे उकळल्याचे निष्पन्न झाल्याची बाजू सरकारी पक्षाने न्यायालयासमोर मांडली. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली.
सरकारी नोकरीचे आमिष
अशरफ, डिम्पी व कल्पनाने केंद्राच्या आरोग्य विभागात मोठ्या पदावर नोकरी लावून देण्यासाठी दोघांकडून पैसे घेतले होते. यातील एक व्यक्ती समोर आली असून, पोलिसांनी त्याचा जबाब नाेंदवला आहे. त्यातील ५० हजारांचा व्यवहार अशरफने केला होता.
लग्नात व्हीआयपी आणण्याचे कंत्राट
विविध शासकीय नाेकऱ्या, नामांकित पुरस्कारांसेाबत तोतया अधिकाऱ्यांच्या या टोळीने अनेक बड्या असामींना त्यांच्या कुटुंबाच्या लग्नात देशातील व्हीआयपी आणण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी लाखो रुपये उकळले. यातील एक १ लाखाचा व्यवहार उघडकीस आला असून, या व्यक्तीचादेखील पोलिसांना शोध लागला आहे. या घोटाळ्यात अशरफनेही अनेक व्यवहार सांभाळल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नामांकित पुरस्कारासाठी शिफारपत्र, सन्मानपत्र असल्याचा दावा करणाऱ्यांची चौकशी केली जाणार असून, त्यांची कागदपत्रे खरी की खोटी, याबाबतही तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.