‘बंद’ मधून शहरात व्यापारी एकजुटीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 11:54 IST2018-09-29T11:52:55+5:302018-09-29T11:54:14+5:30
कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने दिलेल्या बंदच्या हाकेला शहरातील व्यापाऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिल्याने शुक्रवारी बहुतांश भागातील दुकाने दिवसभर बंद राहिली.

‘बंद’ मधून शहरात व्यापारी एकजुटीचे दर्शन
औरंगाबाद : किरकोळ व्यापारात थेट १०० टक्के विदेशी गुंतवणूक रद्द करा, आॅनलाईन व्यापारासाठी सक्षम व पारदर्शी कायदेप्रणाली निर्माण करण्यात यावी, या मागणीसाठी कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने दिलेल्या बंदच्या हाकेला शहरातील व्यापाऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिल्याने शुक्रवारी बहुतांश भागातील दुकाने दिवसभर बंद राहिली. शहरातील व्यापारी एकजुटीचे दर्शनही यानिमित्ताने घडले.
मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेडर्स अॅण्ड कॉमर्स व औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्ह्यात बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. औरंगाबादेत हॉटेल, झेरॉक्स सेंटर, गॅरेज, जनरल स्टोअस, फर्निचर वगळता अन्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. गुलमंडी, पैठणगेट, टिळकपथ, निरालाबाजार,औरंगपुरा, मछलीखडक, रंगारगल्ली, सिटीचौक, सराफा रोड, गांधी पुतळा चौक, चेलीपुरा, भांडीबाजार, केळीबाजार, दिवाणदेवडी, सिडको-हडको, कॅनॉट प्लेस, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर परिसर, शिवाजीनगर, उस्मानपुरा आदी भागांतील दुकाने संपूर्णपणे बंद होती. विशेष म्हणजे एरव्ही कधीही बंद न राहणाऱ्या रोशनगेट, शहाबाजार, लोटाकारंजा या भागातील व्यापाऱ्यांनीही आपापली दुकाने आज बंद ठेऊन व्यापारी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला. सकाळी जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी दुकाने बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांना आवाहन करताना दिसून आले.
कलेक्टर आॅफिससमोर निदर्शने
जिल्हा व्यापारी महासंघातर्फे दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ‘जो व्यापार हित की बात करेगा वही देशपर राज करेगा’, ‘स्वदेशी की घोषणा करनेवाले मत भुलो मेक इन इंडिया’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यानंतर शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी पी.एन. सोरमारे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, माजी अध्यक्ष अजय शहा, आदेशपालसिंग छाबडा, तनसुख झांबड, राकेश सोनी, लक्ष्मीनारायण राठी, सरदार हरिसिंग, दीपक पहाडे, विजय जैस्वाल, जयंत देवळाणकर, गुलाम हक्कानी, कचरू वेळंजकर, ज्ञानेश्वर खर्डेअप्पा, अरुण जाधव, सुभाष पुजारी, प्रवीण पाटील, शिवशंकर स्वामी, आनंद भारुका, गोपाल भारुका, मेहबूबभाई घडीवाले, पप्पूशेठ फेरवाणी यांच्यासह सर्व पदाधिकारी, व्यापाऱ्यांनी परिश्रम घेतले.
वाहन रॅली काढून केला निषेध
‘आॅनलाईन औषधी नकोच नको... जिवाशी खेळ नकोच नको’, ‘औषधाची विक्री आॅनलाईन, धोक्याच्या पातळीवर लाईफलाईन’, अशी घोषवाक्ये लिहिलेले फलक हाती घेऊन जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने शुक्रवारी शहरात वाहन रॅली काढली होती. शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील ३ हजार औषधी दुकाने बंद असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांनी केला. यास बड्या हॉस्पिटलमधील काही औषधी दुकानी अपवाद ठरली. औषधी भवन येथून रॅलीला सुरुवात झाली. अनेकांनी काळा टी-शर्ट परिधान केला होता, तसेच ‘भारत का दवा व्यवसाय बंद’ असे बिल्लेही शर्टला लावले होते. सिटीचौक, जिल्हाधिकारी कार्यालय, शाहगंज, सराफा रोड, गुलमंडीमार्गे रॅली औरंगपुरा येथील औषधी भवन येथे पोहोचली. यानंतर शिष्टमंडळाने सहआयुक्त स.रा. काळे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शैलेंद्र रावत, दिलीप ठोळे, शेखर गाडे, नितीन दांडगे, पंकज राजपूत, वल्लभ भंडारी, किरण जोशी, नंदू काळे, राहुल कोरडे, सागर पाटील, इजामभाई आदी पदाधिकारी हजर होते. बंदच्या निमित्ताने सकाळी सर्व व्यापाऱ्यांत एकीचे चित्र दिसले.मात्र सायंकाळी टिळक पथ, औरंगपुरा, तसेच सिडको भागात दुकाने सुरु झाल्याचे चित्रही दिसले.
२५० ते ३०० कोटींची उलाढाल ठप्प
जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, आजच्या व्यापारी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात २५० ते ३०० कोटींची उलाढाल ठप्प राहिली. बंदसाठी मागील १५ दिवसांपासून महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विविध भागांत व्यापाऱ्यांच्या बैठका घेऊन जनजागृती केल्याने हे शक्य झाले.