छत्रपती संभाजीनगरातील विद्यादीप बालगृहाला टाळे; अनाथ मुलींचे मुंबई, राहुरीसह अन्यत्र स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:56 IST2025-07-19T18:55:57+5:302025-07-19T18:56:49+5:30
छावणीच्या विद्यादीप बालगृहातून नऊ मुलींनी ३० जून रोजी पलायन केल्याचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले.

छत्रपती संभाजीनगरातील विद्यादीप बालगृहाला टाळे; अनाथ मुलींचे मुंबई, राहुरीसह अन्यत्र स्थलांतर
छत्रपती संभाजीनगर : मुलींचा छळ व अमानवीय वागणूक दिल्या प्रकरणात विद्यादीप बालगृहाची मान्यता रद्द झाल्यानंतर मुलींना तत्काळ अन्यत्र स्थलांतरित करण्याचे आदेश न्यायालयासह राज्य सरकारने दिले होते. अखेर, गेल्या तीन दिवसांत ७९ मुलींना मुंबई, राहुरीसह शहरातील अन्य बालगृहांत पाठवण्यात आले. ३० जूनच्या मुलींच्या पलायनानंतर अखेर १८ दिवसांनी शुक्रवारी ७० वर्षांपेक्षाही जुने विद्यादीप बालगृह अखेर पोरके झाले.
छावणीच्या विद्यादीप बालगृहातून नऊ मुलींनी ३० जून रोजी पलायन केल्याचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले. विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षाने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालगृहाची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले. नऊपैकी एका मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सहायक अधीक्षिका वेलरी भगवान जोसेफ, सिस्टर सुचिता भास्कर गायकवाड, केअर टेकर अलका फकीर साळुंके यांना अटक करण्यात आली होती.
बुधवारी औरंगाबाद खंडपीठाने विद्यादीप बालगृहातील मुलींचे स्थलांतर का केले नाही, अशी विचारणा करत केलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बाल कल्याण समितीने राज्यभरातील सर्व बालगृहांना पत्र पाठवून रिक्त जागांबाबत विचारणा केली होती. त्यानंतर मुंबईच्या माटुुंग्यातील बालगृहात ११, राहुरीच्या बालगृहात २२ तर अन्य मुलींना शहरातील बालगृहात पाठवण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
साध्या वेशात महिला पोलिस, सुस्थितीत वाहनांचा वापर
तीन दिवसांपासून मुलींना हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. साध्या वेशातील महिला पोलिसांच्या बंदोबस्तात वाहनांमधून मुलींचे स्थलांतर करावे, प्रवासादरम्यान खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्यावी, असे आदेश बाल कल्याण समितीने दिले होते.
शहरात आता एकच संस्था
विद्यादीपची मान्यता रद्द झाल्यानंतर क्रमाने वाळूजमधील एका बालगृहाने स्वत:हून मुलींचा सांभाळ अशक्य असल्याचे सांगून बालगृह बंद करण्यासाठी शासनाला पत्र पाठवले आहे. त्यामुळे शहरात आता केवळ एकच बालगृह राहिले असून त्याची १०० मुलींची क्षमता आहे.
नियम पालन करुन स्थलांतर
सर्व निर्देशांचे पालनसंबंधित बालगृहांना सदर मुलींची योग्य काळजी घेण्यासाठी संवाद साधला आहे. तिकडे त्यांचे नियमाप्रमाणे शिक्षण सुरू होईल. नियम, निकर्षांचे पालन करुन मुलींचे स्थलांतर करण्यात आले.
- ॲड. आशा शेरखाने-कटके, अध्यक्ष, बाल कल्याण समिती.