video: कडक उन्हात वऱ्हाड निघाले फिरत्या मंडपात; वऱ्हाडींची मनसोक्त नृत्याची हौस पुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:04 IST2022-04-21T11:53:25+5:302022-04-21T12:04:27+5:30
भरदुपारी कडक उन्हात क्रांती चौकातून वरात गेली, फिरत्या कापडी मंडपात वऱ्हाडीनीही संगीताच्या तालावर नृत्य केले.

video: कडक उन्हात वऱ्हाड निघाले फिरत्या मंडपात; वऱ्हाडींची मनसोक्त नृत्याची हौस पुरी
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : बुधवारी भरदुपारच्या उन्हात अंग भाजून निघत होते... थोड्या थोड्या वेळाने लोक पाणी, लिंबू सरबत, ताक पीत होते... अशा उन्हात घरातून बाहेर पडण्याच्या विचाराने अनेकांना घाम फुटत होता... मात्र, त्याच वेळी क्रांती चौकात एक वरात चालली होती. जिथे थोडे चालले की दम लागत होता.. तिथे वऱ्हाडी मनसोक्त झिंगाट नृत्य करीत होते. कारण, त्यांना ऊन लागत नव्हते. खास वऱ्हाडींसाठी चालता, फिरता कापडी मंडप आणण्यात आला होता.
कडक उन्हाळा.. त्यात लग्नतिथी व मुहूर्त भरदुपारचा. वरात काढायची तेही उन्हाची पर्वा न करता.. मग शक्कल लढविण्यात आली. इंदूरहून खास फिरता मंडप शहरात आणण्यात आला. मंडपाला खालून चारी बाजूने चाक व तो मंडप ओढण्यासाठी मजुरांची व्यवस्था अशा कापडी मंडपाच्या सावलीत बँड पथकातील कलाकार वऱ्हाडी चालत होते. मधील मंडपामध्ये काही वऱ्हाडी नृत्य करीत होते. मंडपाच्या सावलीने त्यांना उन्हाचा त्रास झाला नाही. पहिल्यांदाच शहरात असा वरातीचा चालता मंडप पाहून रस्त्याने जाणारे वाहनधारक थोडा वेळ थांबून ही वरात पाहत होते. क्रांती चौकाकडून ही वरात उस्मानपुऱ्याकडे गेली.
कडक उन्हात वऱ्हाड निघाले फिरत्या मंडपात @क्रांती चौक, औरंगाबादpic.twitter.com/NnlyAEIbua
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) April 21, 2022
जिथे कल्पकता, नावीन्य तिथे व्यवसायाला संधी असते. प्रत्येक लग्नसोहळ्यात कल्पकता व नावीन्य हवे असते. ज्यास हे समजले, तो व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहतो. या फिरत्या मंडपाद्वारे हे सिद्ध झाले.