अंधश्रद्धेचे बळी! भूतबाधा झाल्याचे सांगून शिऊरमध्ये अघोरी कृत्य, युवकाला जबर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 14:04 IST2025-07-19T14:01:56+5:302025-07-19T14:04:22+5:30
याप्रकरणी पोलिसांनी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अंधश्रद्धेचे बळी! भूतबाधा झाल्याचे सांगून शिऊरमध्ये अघोरी कृत्य, युवकाला जबर मारहाण
शिऊर (ता. वैजापूर) : येथील प्रसिद्ध मंदिर बिरोबा परिसरात एका मांत्रिकाने भूत पळविण्याच्या नावाखाली एका तरुणाला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे गावात खळबळ उडाली असून या अंधश्रद्धा व अघोरी कृत्यामुळे संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या अघोरी कृत्याचा व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहे. आरोपी भोंदूबाबा संजय पगार हा मांत्रिक आहे. शिऊर येथील बिरोबा मंदिर परिसरात मांत्रिक पगार याने गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास तरुणावर हा अघोरी प्रकार केल्याचे पोलिस कर्मचारी किशोर शांताराम आघाडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी संजय पगार हा बिरोबा मंदिरात बसून समोर बसलेल्या एका व्यक्तीवर भंडारा टाकून त्याला जबरदस्तीने उभे करताना आणि त्याच्या नाकाला बूट लावत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. तसेच दुसऱ्या आणखी एका व्हिडीओत पगार हा भूत उतरवित असल्याचे दिसत आहे.
एका तरुणाला उताणे झोपवून त्याच्या मानेवर पाय देऊन व पोटावर काठी ठेवत 'सोड त्याला, सोड त्याला, नाहीतर धोपटी घालेन' असे म्हणत तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे छत्रपती संभाजीनगर येथील सदस्य रितेश संतोष होळकर यांनी स्टिंग ऑपरेशन केलेले हे व्हिडीओ शिऊर पोलिसांना दिले. पोलिसांनी याची दखल घेत भोंदू बाबा पगारविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक राहुल थोरात हे करीत आहेत. याप्रकरणी अंधश्रद्धा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जनतेची फसवणूक
बिरोबा मंदिर परिसरात एका व्यक्तीकडून कथितरीत्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदरील प्रकार गंभीर असून, यामार्फत जनतेची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याबाबत आमच्या एका कर्मचाऱ्याने सरकारी फिर्यादी होऊन, ही माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य रितेश संतोष होळकर (महाराष्ट्र) यांच्याकडे दिली आहे. या तक्रारीच्या आधारे शिऊर पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू करण्यात आली असून, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाइल.
- वैभव रणखांब, सहायक पोलीस निरीक्षक, शिऊर
भोंदूगिरीचा धंदा
शिऊर ही संतांची भूमी असूनही, तिथेच संत बिरोबाच्या नावाखाली गेली दोन वर्षे जादूटोण्याच्या भोंदूगिरीचा धंदा सुरू आहे. गरीब भक्तांची लूटमार होत असून, हे प्रकार थांबायला हवेत. "खोटं देवाला सहन होत नाही" हेच आता खरे ठरत आहे, असे काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.