केबिनमधून कुलगुरू थेट वर्गात; द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवले गणित, भौतिकशास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:36 IST2025-07-03T15:33:44+5:302025-07-03T15:36:31+5:30
‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब; कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यासह तासिका सुरू असतानाच अचानकपणे विभागांना भेटी देण्याचे नियाेजन केले होते.

केबिनमधून कुलगुरू थेट वर्गात; द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवले गणित, भौतिकशास्त्र
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी ठरविल्याप्रमाणे १ जुलैपासून प्रत्यक्ष वर्गावर जाऊन शिकविण्यास सुरुवात केली. सकाळी १० वाजेपूर्वीच ते कुलगुरूंच्या दालनात दाखल झाले. त्याठिकाणी अर्धा तास काम केल्यानंतर १०:३० वाजता थेट द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वर्गात गेले आणि गणित व भौतिकशास्त्र शिकविण्यास सुरुवात केली. ‘लोकमत’ने १९ जून रोजीच कुलगुरू केबिनमधून थेट वर्गावर जाणार असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.
विद्यापीठातील विविध विभागांमध्ये मंगळवारी (दि.१) द्वितीय वर्षांच्या तासिकांना सुरुवात झाली आहे. अनेक विभागांमध्ये तासिका घेण्यात येत नाहीत. ज्याठिकाणी होतात तेथे उशिराने प्राध्यापक वर्गावर येतात आणि लवकर निघून जातात. अनेक जण कमी विद्यार्थी असल्यामुळे केबिनमध्येच शिकवतात, अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यासह तासिका सुरू असतानाच अचानकपणे विभागांना भेटी देण्याचे नियाेजन केले होते. ते स्वत: फिजिक्सचे प्राध्यापक असल्यामुळे एक तास वर्गावर जाऊन शिकविण्याचे ठरविले होते. याविषयी ‘लोकमत’ने १९ जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानुसार कुलगुरू डॉ. फुलारी हे मंगळवारी सकाळीच १० वाजेपूर्वीच कार्यालयात पोहचले. त्याठिकाणी अर्धातास काम करून थेट फिजिक्स विभागात पोहचले. त्याठिकाणी त्यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मॅथेमॅटिक्स, फिजिक्स हा विषय शिकवला. नियमानुसार कुलगुरूंनी ६० मिनिटे वर्गात अध्यापन केले. वर्गातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी विभागातील प्राध्यापकांची बैठक घेत विविध सूचना केल्याचे समजते.
प्रत्येक विभागातील प्राध्यापक अलर्ट
कुलगुरू डॉ. फुलारी यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे प्राध्यापकांनी तासिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी कुलगुरू कोणत्याही वेळी विभागात येऊ शकतात, या धास्तीने अनेक प्राध्यापकांनी महत्त्वाची कामे असली तरी विभाग सोडले नव्हते. स्वत:च्या कामापेक्षा अनेक प्राध्यापकांनी विभागास प्राधान्य दिल्याचेही दिसून आले.