राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 'वंचित' कडून संविधान, तिरंगा आणि संस्था नोंदणीविषयक कायदा भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 12:40 IST2025-10-25T12:38:26+5:302025-10-25T12:40:51+5:30
यापुढे रेशीमबागेवर मोर्चा काढू असा सुजात आंबेडकर यांनी दिला इशारा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 'वंचित' कडून संविधान, तिरंगा आणि संस्था नोंदणीविषयक कायदा भेट
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधान प्रत, तिरंगा आणि रजिस्ट्रेशनविषयक कायदा भेट देऊन सुजात आंबेडकर व शिष्टमंडळने संघाचे कार्यालय असलेल्या एम्प्लॉयमेंटसमोरील प्रल्हाद भवनात शुक्रवारी दुपारी निषेध नोंदवला. यापुढे रेशीमबागेवर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा अदालत रोडवरच अडवण्यात आला. सुजात आंबेडकर व सहकारी प्रल्हाद भवनापर्यंत जाऊन येईस्तोवर तेथेच प्रचंड घोषणाबाजी व नंतर जाहीर सभेतील भाषणे झाली. अरे, उठा उठा रे, बहुजनांंनी मशाल पेटवू एकीची’ हे गीत सादर करून चैतन्य निर्माण केले.
एका महाविद्यालय परिसरात आरएसएसच्या सदस्य नोंदणीला विरोध केल्याने राहुल मकासरे व विजय वाहूळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे परत घ्यावेत, आरएसएसवर बंद घालावी, या मागण्यांचा आग्रह यावेळी मोर्चेकऱ्यांनी धरला. सुजात आंबेडकर, फारुख अहेमद, सिद्धार्थ मोकळे, अमित भुईगळ, डॉ. नितीन ढेपे, शेख तय्यब, समिभा पाटील, सतीश गायकवाड, जावेद कुरेशी, अफसर खान, पंकज बनसोडे यांच्यासह राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, आंबेडकरी संघटनांचे नेते, समविचारी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मोर्चा वंचितचा होता तरी आंबेडकरी पक्ष - संघटनांचे कार्यकर्ते पक्ष भेद विसरून मोर्चात सहभगी झाले होते. ‘आरएसएस मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद’च्या घोषणांनी संपूर्ण क्रांती चौक परिसर दणाणून गेला. मोर्चा शासकीय कर्मचारी निवासस्थानाच्या बाजूला रस्त्यावर बॅरिकेडिंग लावून रस्ता अडविण्यात आला.
बॅरिकेडिंगच्या पुढे शीघ्रकृती दलाचे जवान उभे होते. तिथे थोडी लोटालोटी केली. विवेकानंद कॉलेजच्या बाजूला रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. शिष्टमंडळ तेथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना निरोप पाठविला; परंतु कोणीही आले नाही. पोलिसांच्या विनंतीला मान देत शिष्टमंडळाने सोबत आणलेला तिरंगा, संविधान आणि नोंदणी कायद्याची प्रत पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडे सुपुर्द केले. रवी तायडे यांच्या आभार प्रदर्शनानंतर व सामूहिक राष्ट्रगीतानंतर मोर्चाचे विसर्जन करण्यात आले.