घाटीची १९१ कोटींची अर्थसंकल्पीय मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:55+5:302021-02-05T04:12:55+5:30
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (घाटी) गाडा मार्चपर्यंत सुरळीत चालण्यासाठी आणि थकबाकीदार पुरवठादारांची देणी चुकविण्यासाठी २० कोटी ...

घाटीची १९१ कोटींची अर्थसंकल्पीय मागणी
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (घाटी) गाडा मार्चपर्यंत सुरळीत चालण्यासाठी आणि थकबाकीदार पुरवठादारांची देणी चुकविण्यासाठी २० कोटी ४५ लाख १ हजार रुपयांची पुरवणी मागणी करण्यात आली होती; तर २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा खर्च भागविण्यासाठी १९१ कोटी ३७ लाख ८० हजारांची मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे.
पुढील वर्षाच्या मागणीतील सुमारे १३० कोटींचा खर्च वेतन आणि कंत्राटी सेवेवर होणार आहे. याशिवायच्या उर्वरित मागणीला कात्री लागल्यास पुन्हा दरवर्षीप्रमाणेच परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे निधीअभावी रुग्णसेवेची कोंडी होऊ नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरवर्षी अर्थसंकल्पातून वितरित अनुदानात घाटीच्या मागणीला कात्री लावण्यात येते. परिणामी हिवाळी अधिवेशनात पुन्हा पुरवणी मागणी करावी लागते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून पुरवणी मागणीचा विचार होत नसल्याने डिसेंबर ते मार्च हा काळ घाटी रुग्णालयासाठी उसनवारी आणि पुरवठादारांच्या विनवण्या करून कसाबसा रुग्णालयाचा गाडा हाकलण्यात येतो. मार्चपर्यंत ३ कोटी २२ लाख २८ हजार कंत्राटी सेवा, २ कोटी ९५ लाख कार्यालयीन खर्च, ४८.०७ संगणक खर्च, ४२.१४ लाख आहार खर्च, सामग्री व पुरवठ्यासाठी ११ कोटी ५२ लाख ५१ हजार, मोटार वाहनांसाठी १३ हजार ९००, यंत्रसामग्री व साधनसामग्रीसाठी ५३.०१ लाख; तर यंत्र व साधनसामग्री देखभाल-दुरुस्तीसाठी १ कोटी २९ लाख ७५ हजार रुपये अशी २० कोटी ४५ लाख ०१ रुपयांची घाटी रुग्णालयाला आवश्यकता आहे, असे अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी सांगितले.
-----
थकलेली देणी
औषधी - १,९५,८८,४६८
रसायने - ४३,५३,९१६
सर्जिकल - १,८२,५४,३७७
क्ष किरण व इतर - ३८,४७,३६०
किरकोळ वस्तू - ७३,८३,५३१
ऑक्सिजन - २,३०,३६,०७८
रुग्ण कापड - १,६१,०४,०५८
एकूण : ९,२५,६८,७८८