"स्मृती विरली तरी प्रीत उरली!" स्मृतिभ्रंश झालेल्या आजोबांसाठी आजींची अढळ निष्ठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 19:40 IST2026-02-14T19:40:32+5:302026-02-14T19:40:58+5:30
शब्दांविना संवाद आणि सुरकुतलेल्या हातांची साथ; 'व्हॅलेंटाईन डे'चा खरा अर्थ या ज्येष्ठ जोडप्यांकडून शिका.

"स्मृती विरली तरी प्रीत उरली!" स्मृतिभ्रंश झालेल्या आजोबांसाठी आजींची अढळ निष्ठा
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : ‘तो शून्यात हरवलेला... त्याला तिची ओळखही उरलेली नाही. तिच्या ‘अहो’ या हाकेलाही त्याच्याकडून ‘ओ’ मिळत नाही. तासनतास तो एकाच दिशेला निर्विकार बघत असतो; पण ती त्याला वाऱ्यावर सोडत नाही. सावलीसारखी कायम त्याच्या पाठीशी उभी राहते. उन्हाला बसल्यावर त्याचा सुरकुतलेला, थरथरणारा हात आपल्या ओंजळीत घेते आणि सुरू होतो आठवणींचा प्रवास... ती लग्नाचे किस्से सांगते, जुन्या दिवसांत रमते. त्याला यातलं काही समजत नाही, हे तिलाही ठाऊक असतं; पण अचानक, जेव्हा त्याच्या डोळ्यांत तिला ओळखीची पुसटशी चमक दिसते, तेव्हा त्याच्या चमकणाऱ्या डोळ्यांच्या ती पुन्हा एकदा प्रेमात पडते. डोळ्यांच्या कडांत दाटलेलं पाणी प्रयत्नाने अडवते आणि आपल्या जोडीदाराचा हात आणखी घट्ट पकडून ठेवते.
आयुष्याच्या संध्याकाळी, जेव्हा शब्द संपतात आणि आठवणी धूसर होतात, तेव्हा ‘स्पर्श’ बोलू लागतो. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘लोकमत’ने जेव्हा ‘स्नेहसावली केअर सेंटर’ला भेट दिली असता कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या ‘प्रेम म्हणजे वणवा नव्हे, त्या तर असतात संथ वाहणाऱ्या दोन पणत्या’ या ओळींचा जिवंत प्रत्यय आला.
- ‘ती’ सावलीसारखी सोबत...
विमला आजी आणि रामराव आजोबा (नाव बदललेले) यांच्या लग्नाला ६० वर्षे लोटली. ८२ वर्षीय आजोबांना स्मृतिभ्रंशामुळे पत्नीचीही ओळख पटत नाही; पण आजी खचल्या नाहीत. ‘लोकमत’शी बोलताना आजींनी त्यांच्या लग्नाविषयी सांगितले. ‘लग्न झाल्यानंतर यांना मी प्रथम पाहिले. आमच्यात कधी फार भांडणे झाली नाहीत; पण एक खंत आहे, लग्नानंतर हे नोकरीच्या गावी आणि मी सासरी पानोडला. यांच्यासोबत जास्त राहता आलं नाही. आता त्यांचा सहवास शेवटपर्यंत मिळावा.’
- वर्षभरानंतर ‘रोझ डे’ला पुनर्भेट
दुसरी कहाणी आहे १९६५ मध्ये विवाह झालेल्या राधाबाई आणि गोविंदरावांची. संकटात पत्नीची ढाल बनून उभे राहणारे आजोबा, पत्नीला अर्धांगवायूचा झटका आल्यावर कोलमडले. ‘स्नेहसावली’त पत्नीसोबत ते राहत. दुर्दैवाने मुलाने कामासाठी त्यांना गावी नेले आणि तिथे अपघाताने त्यांची ताटातूट केली. तब्बल १ वर्षानंतर, बरोबर ‘रोझ डे’च्या दिवशी त्यांची ‘स्नेहसावली’त पुन्हा भेट झाली. ते अजूनही अंथरुणावर आहेत. आजी त्यांच्या बाजूला बसून गप्पा मारत असतात. पतीच्या प्रेमळ तक्रारी करताना राधाबाईंच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. उखाणा घेताना त्यांच्या चेहऱ्यावर आजही लज्जेचे भाव उमटतात.