वैजापूरकरांचा खडतर प्रवास आता संपणार; दोन टप्प्यात ९७ कि.मी. रस्त्यांचे भाग्य उजळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 20:22 IST2019-01-25T20:21:45+5:302019-01-25T20:22:13+5:30
वाहनचालकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. यासोबत ग्रामीण विकासालाही गती मिळणार आहे.

वैजापूरकरांचा खडतर प्रवास आता संपणार; दोन टप्प्यात ९७ कि.मी. रस्त्यांचे भाग्य उजळणार
- मोबीन खान
वैजापूर : रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य, त्यामुळे होणारी आदळआपट, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उडणारी धूळ आणि सतत होणारे अपघात अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेल्या वैजापूरकरांचा खडतर प्रवास आता गुळगुळीत होणार आहे. विशेष म्हणजे महामार्गाची कामे करताना शेतकऱ्यांची एक इंचही जमीन संपादित न करता आहे, त्याच साईडपट्ट्यांवर रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरण करण्यात येत असून, यातील एकाही रस्त्यासाठी वाहनचालकांना टोल भरावा लागणार नाही. हे रस्ते ‘टोल फ्री’ राहणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. यासोबत ग्रामीण विकासालाही गती मिळणार आहे.
तालुक्यातील शिऊर बंगला, औराळा, चापानेर, कन्नड, पिशोर, भराडी, सिल्लोड या ९७ किलोमीटर अंतर असलेल्या राज्य महामागार्साठी ३४६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून दोन टप्प्यात या महामार्गाचे काम करण्यात येणार आहे. याशिवाय वैजापूर - गंगापूर- भेंडाळा फाटा ४६ किलोमीटर, येवला सरहद्द ते शिऊर बंगला २९ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग, शिऊर बंगला ते दिवशी पिंपळगाव २२ किलोमीटर, लासूरस्टेशन ते कोपरगाव तालुक्याच्या सरहद्दीपर्यंत ३४ किलोमीटर (नागपूर-मुंबई महामार्ग), नागमठाण ते गाढेपिंपळगाव प्रमुख जिल्हा मार्ग तीन किलोमीटर, वीरगाव ते सिरसगाव तीन किलोमीटर, खंडाळा ते तलवाडा १२ किलोमीटर, शिऊर बंगला ते टुणकी ७ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी शासनाने कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत.
तालुक्यात एकाचवेळी एवढ्या मोठ्या खर्चाच्या रस्त्यांना प्रथमच मंजुरी मिळाली आहे. जवळपास सर्वच रस्ते १२ मीटर लांबीचे राहणार आहेत. यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून ‘जैसे थ’े होती. संबंधित विभागाकडून केवळ रस्त्यांची मलमपट्टी करून वाहनचालकांची बोळवण करण्यात येत असे. विशेषत: नागपूर-मुंबई महामार्गासह शिऊर बंगला ते कन्नड रस्ता व तालुक्यातील प्रमुख रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून मरणपंथाला लागले आहेत. नागपूर - मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेले. एवढे बळी घेऊन संवेदना बोथट झालेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचे कसलेही सोयरसूतक नव्हते. रस्ते म्हणजे विकासाच्या धमण्या समजल्या जातात. ज्या तालुक्यात दळणवळणासाठी रस्ते चांगले. तेथे सर्वच सोयीस्कर व सुलभ होते. शेतर्कयांच्या शेतमालापासून ते व्यापारी व लहानमोठ्या व्यावसायिकांना माल ने -आण करण्यासाठी रस्ते गुळगुळीत असतील तर विकासात ती भरच असते. तालुक्यातील बहुतांश रस्त्यांकडे आतापर्यंत दुर्लक्ष केले गेले. गेल्या काही दिवसांपासून वैजापूरची ओळख खड्ड्यांचा तालुका म्हणून झाली.
दरम्यानच्या काळात नागपूर-मुंबई महामार्गासह नाशिक - निर्मल राज्य रस्ता ( शिऊर मार्गे ) व वैजापूर - गंगापूर रस्ता या सर्वच रस्त्यांची दाणादाण उडाल्याने औरंगाबादला जायचे कसे, असा गहन प्रश्न नागरिकांना पडला होता. परंतु आता तालुक्यातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांच्या कामांना एकाचवेळी मंजुरी मिळाल्याने नागरिकांना आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. एकतर काहीच नाही. मिळाले तर भरभरून, अशी काहीशी गत रस्त्यांबाबत झाली. शहरातून जाणाऱ्या शिऊर -श्रीरामपूर रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य कधी उजळते, याची प्रतिक्षाही नागरिकांना आहे. दरम्यान, रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळून शुभारंभही करण्यात आला. आता रस्त्यांची कामे पूर्ण होऊन दळणवळणासाठी केव्हा खुली होतात, याबाबतची प्रतिक्षा नागरिकांना आहे.