छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवर जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर कॅरेज वे (रस्ता) तयार करण्यात आल्याचा प्रताप मागील आठवड्यात उघडकीस आला. आता या पाठोपाठ काही ठिकाणी जलवाहिनीवरच युटिलिटी डक्ट तयार करण्यात येत असल्याचे समोर आले. गेवराई गाव येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने युटिलिटी डक्ट उभारणीच्या कामाला विराेध दर्शविला. त्यामुळे काम थांबविण्यात आले. डक्टसाठी खोदण्यात आलेला ३ फूट खोल खड्ड्यात रात्री एखादे वाहन जाऊ शकते, याचा विचारच नॅशनल हायवेने केला नाही.
शहरातील १८ लाख नागरिक नवीन पाणीपुरवठा योजनेतून पाणी कधी येईल, याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मार्च किंवा एप्रिल २०२५ मध्ये पाणी येईल, असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केला आहे. त्यात आता अनेक विघ्न समोर येत आहेत. पहिला सर्वांत मोठा विघ्न म्हणजे जलवाहिनी टाकल्यानंतर नॅशनल हायवेने त्यावर रस्ता तयार केला. जलवाहिनीवरून जड वाहनांची वर्दळ अजिबात चालणार नाही. भविष्यात जलवाहिनी फुटली तर वाहन दीडशे फूट उंच उडू शकते. जलवाहिनीवर रस्ता केल्याचा वाद अजूनही निवळलेला नाही. त्यातच आता युटिलिटी डक्टचा विषय समोर आला. मुख्य जलवाहिनीवर अनेक ठिकाणी डक्ट उभारणी केली जात आहे. यातून विविध केबल, सांडपाणी वाहून जाऊ शकते. भविष्यात जलवाहिनी फुटली तर डक्टची काय अवस्था होईल, याचा विचार नॅशनल हायवेने केला नाही. जलवाहिनीची दुरुस्ती कशी करणार? जलवाहिनीवर ८० ठिकाणी एअर व्हॉल्व्ह येतील. ८ ठिकाणी बटर फ्लाय व्हॉल्व्ह बसविले जातील. डक्ट त्यासाठी मोठा अडसर ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेवराई गाव येथील डक्टचे काम थांबविण्यात आले आहे.
डक्टमुळे ९०० ची जलवाहिनी उघडीमजीप्राने ९०० मिमीची जलवाहिनी टाकली. या जलवाहिनीला कोणताही सपोर्ट नाही. डक्टसाठी खोदकाम केल्याने गेवराई गाव येथे जलवाहिनी उघडी पडली. बीडकीन, जायकवाडी इ. ठिकाणी अनेकदा जलवाहिनी उघडी पडली तर ती प्रेशरने पाइप निखळल्याचे प्रकारही घडले आहेत.
वाहनधारकांसाठी मोठा धोकानॅशनल हायवेने डक्टसाठी ज्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला लांबलचक खड्डा केला तेथे सुरक्षेचे कोणतेही उपाय केलेले नाहीत. साधी रिफ्लेक्टर रिबीन लावण्याची तसदी घेतलेली नाही. रात्री अंधारात एखादे वाहन खड्ड्यात पडले तर मोठा अपघात होऊ शकतो.