अवकाळीने काढले दिवाळीतच दिवाळे; मक्याच्या कणसांना कोंब, कापसाच्या वाती, दुहेरी संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 18:51 IST2025-10-29T18:50:46+5:302025-10-29T18:51:17+5:30
शेतात पाणी साचल्याने मक्याच्या कणसांना जागेवरच कोंब फुटले, वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती होऊन गुणवत्ता घसरली.

अवकाळीने काढले दिवाळीतच दिवाळे; मक्याच्या कणसांना कोंब, कापसाच्या वाती, दुहेरी संकट
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हाता-तोंडाशी आलेला मका, कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. शेतात पाणी साचल्याने मक्याच्या कणसांना जागेवरच कोंब फुटले, वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती होऊन गुणवत्ता घसरली. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न शून्यावर आले.
सिल्लोड, फुलंब्री, कन्नड आणि सोयगाव तालुक्यांमध्ये अवकाळीची तिव्रता अधिक आहे. या पावसामुळे मका, कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी आदी पिकांसह अद्रक पिवळी पडली. शेतातील जनावरांचा चारा भिजून सडला आहे.
सिल्लोड : मंगळवारी सकाळपासून पावसाने तालुक्यात थैमान घातले. अंभई येथे गट क्रमांक ३१२ मध्ये शेतकरी मजहर देशमुख यांच्या शेतात म्हैस व वगार ठार झाली.
फुलंब्री : तालुक्यात मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. पुलंब्री, तळेगाव, पिरबावडा, निधोना, वाकोद, वडोदबाजारात जोरदार पाऊस झाला.
कन्नड : तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात आठव्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. नागद, पिशोर, चापानेर परिसरातही मुसळधार पाऊस झाला.
सोयगाव : मुसळधार पावसाने सतत ७ तास शहराला झोडपून काढले. सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या पावसामुळे सोयगाव, जरंडी, घोसला, बनोटीत नद्यांना पूर आला.