तेरा वर्षीय मुलावर नशेखोराचा अनैसर्गिक अत्याचार; छत्रपती संभाजीनगरातील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:23 IST2025-09-02T17:22:57+5:302025-09-02T17:23:55+5:30
पोलिसांकडून आरोपीला तत्काळ अटक

तेरा वर्षीय मुलावर नशेखोराचा अनैसर्गिक अत्याचार; छत्रपती संभाजीनगरातील संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगर : किराणा सामान आणायला जाणाऱ्या तेरा वर्षीय मुलाला निर्मनुष्य परिसरात नेत चाकूचा धाक दाखवत एका विकृत नशेखोराने अनैसर्गिक अत्याचार केला. रविवारी रात्री १० वाजता जिन्सीत ही संतापजनक घटना घडली. वसीम अजीम शेख (२०) असे विकृताचे नाव असून, जिन्सी पोलिसांनी सोमवारी रात्री त्याला अटक केली.
१३ वर्षीय मुलगा कुटुंबासह जिन्सी परिसरातच वास्तव्यास असतो. ३१ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता पालकांनी त्याला सामान आणायला सांगितले. घरापासूनच जवळच्याच दुकानावर पायी जात असताना वसीमने त्याचा हात पकडून धमकावले. तेथेच एका पडक्या घराच्या मागे घेऊन जात चाकूचा धाक दाखवत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. घाबरलेल्या मुलाने घरी जाताच पालकांना सांगितले. संतप्त पालकांनी जिन्सी पोलिस ठाण्यात धाव घेतली. वैद्यकीय तपासणीत मुलावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, पोलिसांनी बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.
लुटमारीचा गुन्हा दाखल, नशेच्या आहारी
वसीम नशेच्या आहारी गेलेला असून, गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर या वर्षीच जिन्सी पोलिस ठाण्यात एक लुटमारीचाही गुन्हा दाखल आहे. मुलाने सांगितलेल्या वर्णनानंतर उपनिरीक्षक गणेश माने यांनी तत्काळ त्याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.