अनोखी परंपरा! एक असे मंदिर जिथे आद्यपूजेचा मान शनिदेवाला, नंतर गणपतीला अभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 20:09 IST2025-05-26T20:08:59+5:302025-05-26T20:09:33+5:30
देशातील एकमेव पैठणमधील शनिगणपती मंदिर, काय आहे आख्यायिका?

अनोखी परंपरा! एक असे मंदिर जिथे आद्यपूजेचा मान शनिदेवाला, नंतर गणपतीला अभिषेक
छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ‘विघ्नहर्ता’ गणपतीच्या अभिषेकाने होते. मात्र, असे एक मंदिर आहे, जिथे गणाधिपतीच्या ऐवजी आद्यपूजेचा मान शनिदेवाला दिला जातो. म्हणजेच प्रथम शनिदेवाची पूजा व नंतर गणरायाचा अभिषेक केला जातो. देशातील हे एकमेव असे मंदिर आहे, जिथे अशी अनोखी परंपरा शेकडो वर्षांपासून जपली जाते.
पैठण येथील ‘शनिगणपती’
दक्षिण काशी म्हणून ज्या नगरीचा उल्लेख केला जातो, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण होय. जिथे गोदावरी नदीकडून नाथांच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे. तेच ‘शनिगणपती’ मंदिर.
पहिले शनिदेवाचे दर्शन, मग बाप्पाचे
हे अगदी छोटेखानी पश्चिममुखी मंदिर आहे. ते एका ओट्यावर बांधलेलं आहे. मंदिरात सर्वप्रथम काळ्या पाषाणातील शनिदेवाच्या मूर्तीचे दर्शन घडते. या मूर्तीचा आकार दीड फूट आहे. त्यानंतर पाठीमागील बाजूला शेंदूरवर्णीय साडेतीन फूट बाय तीन फूट असलेल्या चतुर्भुज श्रीगणेशाच्या मूर्तीचे दर्शन घडते. मूळ ही मूर्तीही काळ्या पाषाणातीलच आहे, पण शेंदूर लावल्याने ती सिंदूरवर्णीय झाली आहे.
काय आहे आख्यायिका?
मंदिराचे पुजारी वे. शा. सं. अविनाश महेशपाठक गुरुजी सांगतात की, प्रत्यक्षात गणपतीलाच साडेसातीची बाधा सुरू होती. त्यावेळी शनिदेवाने साडेसातीमध्ये आद्यपूजेचा मान मला मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली. हा पुराणकथेतला संदर्भ आहे. त्यानुसार पैठणमध्ये शनिगणपतीचे मंदिर उभे राहिले. साडेसातीच्या काळात जीवनाची कठीण परीक्षा घेणारा शनिदेव आणि विघ्नहर्ता या दोन्ही देवता एकाच ठिकाणी विराजमान आहेत. याच मंदिरात आधी शनिदेवाची पूजा, नंतर गणपतीचा अभिषेक केला जातो.
यादवकालीन मंदिर
हे देशातील एकमेव मंदिर यादवकालीन असल्याचा पुराणकथेत संदर्भ आढळतो. गोकुळाष्टमीवेळी स्वतः शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज शनिमंदिरात येऊन कुलाचार करत. ही कुलाचाराची परंपरा त्यांचे वंशज गोसावी परिवार आजही पुढे चालवत आहेत.
साडेसातीच्या काळात बाजीराव पेशव्यांनी घेतले दर्शन
आयुष्यात एकाही लढाईत न हरलेले बाजीराव पेशवे, त्यांच्या साडेसातीच्या काळात लढाईला सामोरे जात होते. त्यावेळी त्यांनी पैठणला येऊन शनिगणपतीचे दर्शन घेतले आणि नंतर पालखेडची लढाई जिंकली.