दुसऱ्या लाटेच्या नावाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST2020-12-17T04:31:34+5:302020-12-17T04:31:34+5:30
सरकारी व्हेंटिलेटर खाजगीतच सक्रीय रुग्ण घटले : लसीकरणाची तयारी, पण व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांकडेच संतोष हिरेमठ औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य ...

दुसऱ्या लाटेच्या नावाखाली
सरकारी व्हेंटिलेटर खाजगीतच
सक्रीय रुग्ण घटले : लसीकरणाची तयारी, पण व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांकडेच
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य विभागाचे तब्बल २६ व्हेंटिलेटर अद्यापही शहरातील विविध खाजगी रुग्णालयांतच आहे. सक्रिय आणि गंभीर रुग्णांची संख्या घटली आहे. लसीकरणाचीही जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, खाजगी रुग्णालयांना देण्यात आलेले व्हेंटिलेटर दुसऱ्या लाटेच्या नावाखाली परत घेण्याचे आरोग्य विभाग टाळत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे तब्बल २६ व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना देण्यात आले. हा प्रकार ‘लोकमत’ने १० ऑगस्ट रोजी ‘सरकारी व्हेंटिलेटर गेले खाजगीमध्ये’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. औरंगाबाद जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा कहर सुरू होता. दररोज कोरोनामुळे रुग्णांचा जीव जात होता. त्यात गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत जीव गमवण्याची वेळ येत होती. उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत असल्याची परिस्थिती होती. तेव्हा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अंतर्गत असलेले म्हणजेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे २६ व्हेंटिलेटर विविध ७ खाजगी रुग्णालयांना दिल्याचे समोर आले.
जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजारांवर हाेती. पण ऑक्टोबरपासून काेरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली. आजघडीला पाचशेच्या घरात सक्रिय रुग्ण आहे. गंभीर रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. असे असताना खाजगी रुग्णालयांना दिलेले व्हेंटिलेटर घेण्याचा कोणताच विचार होताना दिसत नाही. याविषयी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, आगामी कालावधीत दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही लाट येणार नाही, असे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे व्हेंटिलेटर परत घेण्यात आलेले नाहीत.
पैसे आकारण्याचा प्रकार?
खाजगी रुग्णालयांना काही अटी आणि शर्तीवर व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. त्यांनी हे व्हेंटिलेटर लावलेल्या रुग्णांकडून जर त्याचे पैसे आकारले तर व्हेंटिलेटर प्रशासनाकडून परत घेतले जातील, असे तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले होते. परंतु यावर कोणीही देखरेख ठेवत नसल्याची स्थिती आहे.