महाराष्ट्र निवडणूक 2019: आता तरी कागदी घोडे नाचवू नका; शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 15:29 IST2019-11-03T15:27:28+5:302019-11-03T15:29:27+5:30
बळीराजाला देण्यात आलेल्या मदतीवरून दोन्ही पक्षांमधले मतभेद समोर आलेले आहेत.

महाराष्ट्र निवडणूक 2019: आता तरी कागदी घोडे नाचवू नका; शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं
औरंगाबादः महाराष्ट्राच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. सत्तावाटपाचा संघर्ष दोन्ही पक्षांकडून शिगेला पोहोचला आहे. भाजपा शिवसेनेला सत्तेत झुकतं माप देण्यास तयार नाही. प्रसंगी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू, असा इशारा दिल्यानंतर शिवसेनेनंही आक्रमक पवित्रा घेत आमचाच मुख्यमंत्री बसवू, असं म्हटलं आहे. त्यामुळे दोघांमधला हा संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच आता बळीराजाला देण्यात आलेल्या मदतीवरून दोन्ही पक्षांमधले मतभेद समोर आलेले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज मराठवाड्याचा दौरा केला असून, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल भूमिका स्पष्ट केली.
शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत द्यावी, जास्त कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना मदत करावी. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत तुटपुंजी असल्याचीही टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. मी शेतकऱ्यांना भेटी दिल्या, अधिकाऱ्यांची भेट घेतली. पाहणी दौरा हा काय हेलिकॉप्टरमधून करण्याचा दौरा नाही. शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे. हाततोंडाशी आलेला घास आता हिरावून घेतलेला आहे. जी पिकं घराला आधार देतील, अशा परिस्थितीत होती. ती एका रात्रीत मातीमोल झाली. चारासुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्यांसमोर गुरांना चारा कसा द्यायचा हाही प्रश्न आहे. या परिस्थितीवर मात करणं हे फार गरजेचं असल्याचंही प्रतिपादनही उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
शेतकरी म्हणतात, आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. मी सांगितलं असा शब्दही तुम्ही काढू नका. आत्महत्या करून तुम्ही तुमचं घर पोरखं करू नका. या संकटांत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याचाच चिखल झालेला आहे, त्याला चिखलातून बाहेर काढू या, शेतकऱ्यांना येणाऱ्या बँकांच्या नोटीस तातडीनं थांबवाव्यात. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारनंदेखील पुढाकार घ्यावा. तांत्रिक बाबींमध्ये अडकवू नका. माणुसकीतून मदत करा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.