कोलठाण तलावात दोन तरुणांचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 18:07 IST2026-03-03T18:06:31+5:302026-03-03T18:07:06+5:30

खाटूश्याम दर्शनावरून परतताना पोहण्याचा मोह जीवघेणा ठरला

two youths meet tragic end in Kolthan Lake | कोलठाण तलावात दोन तरुणांचा दुर्दैवी अंत

कोलठाण तलावात दोन तरुणांचा दुर्दैवी अंत

फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कोलठाण शिवारातील तलावात मंगळवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने चिखलठाणा परिसर शोकसागरात बुडाला. पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सचिन गजानन वराडे (वय २१) आणि समर्थ बाबासाहेब चितळे (वय १६) अशी मृतांची नावे असून दोघेही चिखलठाणा येथील सावित्री नगर परिसरातील रहिवासी होते.

मंगळवारी सकाळी आठ मित्र दुचाकीवरून खाटूश्याम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. गर्दी असल्याने बाहेरूनच दर्शन घेऊन ते परतीच्या मार्गाला लागले. दुपारी सुमारास कोलठाण शिवारातील तलावाजवळ आल्यावर पाण्याचे आकर्षण आवरले नाही. सुरुवातीला पाच मित्रांनी पाण्यात उडी घेतली. काठाजवळ पाणी कमी असल्याने सर्वजण निर्धास्त होते. मात्र सचिन व समर्थ पोहत पोहत तलावाच्या खोल भागात गेले आणि क्षणात पाण्याखाली अदृश्य झाले.

काही वेळ मित्रांच्या लक्षातच आले नाही. पाठीमागून आलेल्या मित्रांनी विचारणा केल्यावर दोघे दिसत नसल्याचे समजताच घबराट उडाली. स्थानिक नागरिक व फुलंब्री पोलिसांना तत्काळ कळविण्यात आले. स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता तलावात उतरून दोघांना बाहेर काढले. त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

एकुलत्या एक मुलाचा अंत

सचिन वराडे हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो गॅरेजवर काम करत होता, तर वडील ट्रॅक्टर चालक आहेत. कुटुंबात आई-वडील व एक बहीण असा परिवार आहे. कष्टाने संसार उभा करणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दहावीच्या सुट्टीत काळाचा घाला

समर्थ चितळे हा मूळचा चाकेगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर येथील असून मागील वर्षभरापासून चिखलठाणा येथे मामाच्या घरी राहत होता. तो राजश्री शाहू विद्यालयात दहावीचा विद्यार्थी होता. सोमवारीच त्याने दहावीचा पेपर दिला होता. मंगळवारी सुट्टी असल्याने मित्रांसोबत फिरायला गेला आणि काळाने घाला घातला.

घटनेची माहिती मिळताच सावित्री नगर परिसरात शोककळा पसरली. दोन उमलत्या जीवांचा असा अकाली अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह धाव घेतली तलावा तून मृतदेह  बाहेर काढून त्यांना रुग्णवाहिके द्वारे छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात पाठविले. या घटनेचा पंचनामा जमादार कैलास राठोड यांनी केला असून पुढील तपास सपोनी रघुवीर मुराडे करीत आहेत

Web Title : कोलठन झील में दो युवकों की दुखद डूबने से मौत; समुदाय में शोक

Web Summary : छत्रपति संभाजीनगर के पास कोलठन झील में तैरते समय सचिन और समर्थ नाम के दो दोस्त डूब गए। वे एक समूह का हिस्सा थे जो पहले एक मंदिर गए थे। समुदाय युवा पुरुषों के नुकसान पर शोक व्यक्त कर रहा है, जिनमें से एक इकलौता बच्चा था, दूसरा एक छात्र।

Web Title : Two Young Men Tragically Drown in Kolthan Lake; Community Mourns

Web Summary : Two friends, Sachin and Samarth, drowned in Kolthan Lake near Chhatrapati Sambhajinagar while swimming. They were part of a group who visited a temple earlier. The community mourns the loss of the young men, one an only child, the other a student.