फुलंब्री-राजूर मार्गावर टेम्पो-कारच्या भीषण अपघातात दोन तरुण ठार, तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 19:44 IST2025-09-13T19:44:01+5:302025-09-13T19:44:16+5:30
पिंपळगाव-गंगादेव शिवारातील घटना, या अपघातात टेम्पोच्या धडकेत कारचा चुराडा झाला आहे

फुलंब्री-राजूर मार्गावर टेम्पो-कारच्या भीषण अपघातात दोन तरुण ठार, तिघे गंभीर जखमी
फुलंब्री : फुलंब्री- राजूर महामार्गावर पिंपळगाव- गंगादेव शिवारात शुक्रवारी (दि.१२) रात्री ११:०० वाजता आयशर टेम्पो आणि ब्रेझा कार यांचा समोरासमोर अपघात झाला. यात ब्रेझा कार चक्काचूर झाली असून, तिच्यातील दोन तरुण जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
सतीश केशवराव कोलते (वय २३) आणि आदित्य राजू कोलते (वय २२, दोघेही रा. टाकळी कोलते, ता. फुलंब्री), अशी अपघातातील मयतांची नावे आहेत. अक्षय भगवान कोलते (वय २५, रा. टाकळी कोलते), अजय बबन सोळुंके (वय २५, रा. रिधोरा, ता. फुलंब्री) आणि एक जण गंभीर जखमी आहे. हे तरुण रात्री ११:०० वाजेच्या सुमारास फुलंब्रीकडून टाकळी कोलते या गावी जात होते. दरम्यान, पिंपळगाव- गंगादेव शिवारात मोसंबीची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच २१ बीएच १६९७) आणि तरुणांच्या ब्रेझा कारचा (एमएच २० ईवाय ४४५१) अपघात झाला. यात कारचा चुराडा झाला. त्यातील दोन तरुण जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच फुलंब्री ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सहाणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोन्ही मृतदेह फुलंब्रीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. दरम्यान, चालक टेम्पो सोडून पसार झाला. पुढील तपास फुलंब्री पोलिस करीत आहेत. या भीषण अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
दोघेही अविवाहित
मयत सतीश हा शेती करीत होता, तर आदित्य अजून शिकत होता. हे दोघेही अविवाहित होते. आदित्यचे वडील व्यावसायिक ऑडिटर आहेत. त्यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण टाकळी कोलते गावावर शोककळा पसरली असून, ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.