वेगाने जीव गेला! दोन दुचाकींच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू, दोघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 17:07 IST2023-05-29T17:06:24+5:302023-05-29T17:07:24+5:30
वैजापूर-गंगापूर रस्त्यावरील घटना; जखमींवर घाटीत उपचार सुरू

वेगाने जीव गेला! दोन दुचाकींच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू, दोघे गंभीर
वैजापूर: भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास वैजापूर-गंगापूर रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ घडली. सागर शिवसिंग राजपूत (वय २५ वर्षे, रा. परदेशी गल्ली, वैजापूर) व साहिल दत्तात्रय पगारे (वय २२, रा. शिर्डी) अशी मयतांची नावे आहेत.
वैजापूर येथील सागर राजपूत हा त्याच्या दुचाकीवर (एम. एच. २० ईडी ३८५०) गंगापूर चौफुलीकडून वैजापूर शहराकडे येत होता. तर साहिल पगारे, शुभम साबळे (वय २०, रा. पंचशीलनगर, वैजापूर) व अजय दुशिंग (वय २२, रा. शिर्डी) हे तिघे एका दुचाकीने वैजापूर शहराकडून गंगापूर चौफुलीच्या दिशेने जात होते. वैजापूर-गंगापूर रस्त्यावर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या जवळ या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. दोन्ही दुचाकी वेगात असल्याने या अपघातात चारही जण गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच उपस्थितांनी त्यांना उपचारासाठी वैजापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सागर राजपूत व साहिल पगारे यांना तपासून मृत घोषित केले. तर गंभीर जखमी शुभम साबळे व अजय दुशींग यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पवन राजपूत, गणेश पैठणकर, निकम यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या अपघाताची वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.