दोन वर्षीय चिमुकल्याचा गुलाबजामूनच्या गरम पाकामध्ये पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 13:58 IST2018-11-26T13:57:44+5:302018-11-26T13:58:23+5:30
गरम पाकात खेळता खेळता पडल्याने गंभीर भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दोन वर्षीय चिमुकल्याचा गुलाबजामूनच्या गरम पाकामध्ये पडून मृत्यू
औरंगाबाद : घरातील धार्मिक कार्यक्रमानिमित्त बनत असलेल्या गुलाब जामूनच्या गरम पाकात खेळता खेळता पडल्याने गंभीर भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजवीर नितीन मेघावाले असे मृत चिमुकल्याचे नाव असून ही घटना गुरुवारी दुपारी दलालवाडी भागात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दलालवाडी भागात राहणाऱ्या मेघावाले यांच्या कुटुंबात गुरुवारी (दि.२२) धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी घराजवळच स्वयंपाक बनविणे सुरू होते. याच ठिकाणी दोन वर्षीय राजवीर खेळत होता. स्वयंपाकासाठी तयार करण्यात आलेला गुलाब जामूनसाठीचा उकळलेला पाक थंड होण्यासाठी ठेवून घरातील मंडळी कामात व्यग्र होते. त्यावेळी राजवीर अचानक पाकाच्या भांड्यात पडला . यानंतर त्याला लगेच खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
यानंतर अधिक उपचारासाठी राजवीरला घाटी रुग्णालायत दाखल केले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.