'दाम दुप्पट'चे आमिष देऊन दोन महिलांनी तिघींची केली ६५ लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 19:25 IST2019-02-27T19:22:15+5:302019-02-27T19:25:44+5:30
पैसे परत देण्याची वेळ आल्यावर तुम्ही आम्हाला व्याजाने पैसे दिले म्हणून पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली

'दाम दुप्पट'चे आमिष देऊन दोन महिलांनी तिघींची केली ६५ लाखाची फसवणूक
औरंगाबाद : साडी विक्रीचे दुकान, गुत्तेदारीत पैसा गुंतविल्यास दुप्पट पैसे मिळतील, असे भासवून दोन महिलांनी तीन जणींची चक्क ६५ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलांनी मंगळवारी रात्री पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. पोलिसांनी ठगसेन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्याकडे वर्ग केले.
दशमेशनगर भागातील राठी टॉवर्स येथील रहिवासी शुभांगी चंद्रकांत कुलकर्णी (४५) यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या सविस्तर तक्रारीत नमूद केले की, २०१६ मध्ये पतीच्या निधनानंतर वेदांत डिझायनर साडी या नावाने साडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. गारखेडा भागात अनुराधा पवार आणि तिची बहीण सुवर्णा संजय मनगटे यांना त्या दहा वर्षांपासून ओळखतात. २०१७ मध्ये अनुराधा पवार यांनी अनुज कलेक्शन हे कापडाचे दुकान सुरू केले.
शुभांगी कुलकर्णी आपल्या मैत्रीण ज्योती देशमुख यांच्यासह पवार, मनगटे यांना भेटायला गेल्या. दोघी बहिणींनी भागीदारीत साडी विक्रीचा व्यवसाय करण्याची आॅफर दिली. गुंतवणूक केलेल्या रकमेचे नंतर दुप्पट मिळतील, असेही आमिष दाखविले. शुभांगी कुलकर्णी यांनी अगोदर दीड लाख दिले. नंतर आणखी ५ लाख मागितले. ही रक्कमही त्यांनी उधार सोने मोडून आणून दिली. दोन सोन्याच्या अंगठ्याही काढून घेतल्या. ११ लाख ७० हजार पैसे अनुराधा पवार हिने उकळले.
त्यानंतर तिची बहीण सुवर्णा मनगटे हिने त्यांना गुत्तेदारीचे आमिष दाखवून १४ लाख २५ हजार रुपये दिले. शुभांगी कुलकर्णी या लाखो रुपयांची गुंतवणूक करीत असताना त्यांची मैत्रीण ज्योती देशमुख यांनीही ११ लाख रुपये साडी विक्रीच्या व्यवसायात गुंतविले. सुनंदा सुराणा या दुसऱ्या मैत्रिणीकडून २८ लाख ५० हजार रुपये घेतले. एकूण तीन महिलांकडून दोघी बहिणींनी ६५ लाख ४५ हजार रुपये घेतले. पैसे परत देण्याची वेळ आल्यावर तुम्ही आम्हाला व्याजाने पैसे दिले म्हणून पोलीस तक्रार करीन, अशी धमकी दोघींनी दिली.