भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ५० फुट दूर फेकला गेला; डोक्याला मार लागल्याने जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 17:44 IST2021-02-18T17:33:33+5:302021-02-18T17:44:33+5:30
Accident news Aurangabad अपघातानंतर टेम्पोचालक वाहनासह फरार झाला.

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ५० फुट दूर फेकला गेला; डोक्याला मार लागल्याने जागीच ठार
चिंचोली लिंबाजी ( औरंगाबाद ) : करंजखेड-घाटशेंद्रा रस्त्यावरील शनेश्वर देवस्थानाजवळ छोट्या टेम्पाेने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला आहे. अपघातानंतर टेम्पोचालक वाहनासह फरार झाला. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली असून सईद लायक कुरेशी(२८, रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाटनांद्रा येथील रहिवासी सईद कुरेशी हा तरुण गुरुवारी सकाळी दुचाकी(क्र. एम. एच.२० डी. ए. ४०९६)ने नागापूरकडून घाटनांद्र्याकडे जात होता. १० वाजेच्या दरम्यान वाकी चौफुलीपासून काही अंतरावर असलेल्या शनेश्वर देवस्थानाजवळ समोरुन भरधाव येणाऱ्या छोट्या टेम्पो(क्र.एम. एच २० ई. जी. ५७२५)ने दुचाकीला जोराची धडक दिली. अपघात इतका भयानक होता की, सईद ५० फूट अंतरावर फेकला गेला. यात डोक्याला गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर टेम्पोचालकाला परिसरातील शेतकऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र, सुसाट वेगाने तो रेऊळगावच्या दिशेने फरार झाला. पिशोर पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार श्रावण तायडे, एस. के. पठाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. मयत सईद कुरेशी याच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. सदरील तरुणांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून कुटुंबाचा आधार गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.