तडा गेलेल्या रुळावरून दोन रेल्वे गेल्या; वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, प्रवासी बालंबाल बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 11:31 IST2022-06-13T20:19:25+5:302022-06-14T11:31:40+5:30
जोडावरची वेल्डिंग तुटल्यामुळे घडली घटना, तातडीने तासाभरात दुरुस्ती करण्यात आली

तडा गेलेल्या रुळावरून दोन रेल्वे गेल्या; वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, प्रवासी बालंबाल बचावले
उन्हाळ्यामध्ये रेल्वेचे रुळ हे प्रसरण पावत असतात. त्यांची लांबी-रुंदी वाढत असते. हे सर्व उन्हामुळे घडते. गरम झालेल्या पटरीवरुन वजनदार रेल्वे गेल्यामुळे हा प्रकार होतो. पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर रेल्वे पटरीच्या खाली असलेला पायटा माती दबल्यास त्याठिकाणी पम्पिंग होते. अशा ठिकाणाहुन रेल्वे गेल्यामुळे रुळाच्या मध्यभागालाही क्रॅक जाण्याची शक्यता अधिक असते. त्याच पद्धतीचा प्रकार रविवारी सकाळी मुकुंदवडी ते चिकलठाणा रेल्वेस्थानकादरम्यान राजनगर येथे घटना घडली.
जनशताब्दी एक्सप्रेस रुळावरुन गेल्यानंतर त्या गाडीच्या चालकाला रुळावर मोठा आवाज झाल्याचे कळले. त्यामुळे त्या चालकांने तात्काळ माहिती रेल्वे विभागाला कळविली. या रेल्वेच्या नंतर आलेली मराठवाडा एक्सप्रेस गाडीही क्रॅक गेलेल्या रुळावरुनच गेली. या गाडीचा वेग अतिशय कमी होता. त्यामुळे रेल्वे रुळ बाजूला सरकले नाहीत. अन्यथा वेगात गाडी असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी शक्यता रेल्वेच्या सूत्रांनी दिली. मराठवाडा एक्सप्रेस गाडी क्रॅक झालेल्या रुळावरुन गेल्यानंतर रेल्वेच्या अभियंत्रिकी विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले. या पथकाने सुरुवातीला क्लॅम पट्टी लावली. त्यानंतर काही वेळातच रुळाला वेल्डिंगने जोडून घेत दुरुस्ती केली. यानंतर काही वेळातच रुळावरुन रेल्वे गेल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
चालकाने दिली कल्पना
जनशताब्दी एक्सप्रेस गाडी रेल्वे रुळावरुन गेल्यानंतर मोठा आवाज झाल्याची माहिती चालकाने दिल्यामुळे पुढील घटनांची दुर्घटना टळली आहे. हा सर्व प्रकार रेल्वे विभागासाठी रुटीनचाच प्रकार असल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.