दौलताबादरोडवर कार व ट्रकच्या भीषण अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:11 IST2019-03-05T19:10:48+5:302019-03-05T19:11:07+5:30
अपघात एवढा भीषण होता की, कारचे अवशेष १०० फुटापर्यंत विखुरलेले होते.

दौलताबादरोडवर कार व ट्रकच्या भीषण अपघातात दोन ठार
औरंगाबाद : दौलताबादरोडवर जांभळा गावाजवळ आज सकाळी १० वाजेच्या सुमारास कार व ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात दोनजण जागीच ठार झाले आहेत तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कारचे अवशेष १०० फुटापर्यंत विखुरलेले होते. तर पन्नास फुट दूर पडलेल्या इंजिनसोबत एकजण मृत अवस्थेत आढळून आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी तारांगण मिटमिटा येथून जांभळा गावाच्या दिशेने एक कार (MH 20 DF 0295) जात होती. यात चारजण होते. याच दरम्यान समोरून कसाबखेडा येथून एक भरधाव ट्रक ( PB 13AL 7471 ) येत होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात ट्रकने कारला 100 फुटापर्यंत फरफटत नेले. यामुळे १०० फुटापर्यंत कारचे अवशेष विखुरले होते. अपघात एवढा भीषण होता की,कारचे इंजिन पन्नास फुट दूर फेकले गेले होते. या इंजीनासोबत कारमधील एकजणसुद्धा बाहेर फेकला गेला. यात कारमधील दोघे जागीच ठार झाले तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत. शेख वाजेद शेख अजगर (36 ) , अब्दुल गाणी अब्दुल समद (34 ) अशी मृतांची नावे असून शेख नासिर शेख बाबू ( 29 ) , शेख अजीम शेख अकबर (30) हे जखमी आहेत. सर्वजण तारांगण सोसायटीसमोर, मिसबह कॉलोनी येथील रहिवासी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक विक्रम वडने यांनी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केले. कारचे अवशेष रस्त्यावर विखुरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. कारमधील चोघे अपघात परिसरात राहणारे असल्याने बघ्यांची मोठ्याप्रमाणावर गर्दी जमली. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली. वाहतूक शाखेचे सहायक उपायुक्त ज्ञानोबा मुंढे, छावणी वाहतूक निरीक्षक नाथा जाधव, ईल्यास पठाण, जी. एच. राठोड, अनिल राठोड महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.