ट्रक-जीपच्या धडकेत दोन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:43 IST2019-02-11T00:43:10+5:302019-02-11T00:43:27+5:30
फुलंब्री-खुलताबाद रस्त्यावर किनगाव फाट्यानजीक शनिवारी मध्यरात्री हायवा ट्रक व जीपची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. मृत दोघेही तालुक्यातील गणोरी येथील रहिवासी आहेत.

ट्रक-जीपच्या धडकेत दोन तरुण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलंब्री : फुलंब्री-खुलताबाद रस्त्यावर किनगाव फाट्यानजीक शनिवारी मध्यरात्री हायवा ट्रक व जीपची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. मृत दोघेही तालुक्यातील गणोरी येथील रहिवासी आहेत.
बाबासाहेब आसाराम बोडखे (४०), वैजीनाथ निवृत्ती पेहेरकर (३२, रा. गणोरी), अशी मृतांची नावे आहेत. राहुल बंडू गायकवाड (२७, रा. गणोरी) हा जखमी असून, त्याच्यावर औरंगाबादेतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गणोरी येथील हे तिघे तरुण शनिवारी रात्री जीपने (क्र. एम.एच.०५ -बीएच -५५५६) वानेगाव येथे लग्न सोहळ्याला गेले होते. लग्न आटोपून परतत असताना किनगाव फाट्यानजीक समोरून येणाऱ्या हायवा ट्रकशी (क्र. एम.एच.२० -इजी-९७५९) जोरदार धडक झाली.
अपघात एवढा भीषण होता की, यात जीपचा चुराडा झाला व तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी बाबासाहेब बोडखे याला तपासून मृत घोषित केले, तर काही वेळाने वैजीनाथ पेहेरकर याचाही मृत्यू झाला. जखमी राहुल गायकवाडवर उपचार सुरू आहेत.
घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रविवारी गणोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. फुलंब्री पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळपर्यंत या घटनेची नोंद झालेली नव्हती.