दुचाकीचा धक्का लागल्याने दोन गट भिडले; कैलासनगरातील राड्यात चाकू, कोयते निघाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:42 IST2024-12-10T13:39:07+5:302024-12-10T13:42:38+5:30
भांडण एवढे विकोपाला गेले की, युवकांनी चाकू, कोयते बाहेर काढले.

दुचाकीचा धक्का लागल्याने दोन गट भिडले; कैलासनगरातील राड्यात चाकू, कोयते निघाले
छत्रपती संभाजीनगर : कैलासनगरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून सोमवारी दोन गट आपसात भिडले. भांडण एवढे विकोपाला गेले की, युवकांनी चाकू, कोयते बाहेर काढले. यात एकाच्या डोक्याला ३ टाके पडले. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
विशाल संजय पिठले (२९) आणि रमेश बबरू पिठले (४२, दोघे रा.दत्तनगर) अशी जखमींची नावे आहेत. अनिकेत आणि रोहन यांच्यासह ७ ते ८ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. विशाल पिठले हा आकाशवाणीजवळील दुकानात कामाला आहे. तो नेहमीप्रमाणे काम आटोपून घरी येत होता. यावेळी अनिकेत व त्याचे मित्र कैलासनगर येथील रस्त्यावर उभे होते. विशालकडून या टोळक्यातील एकाला दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे, टोळक्यातील तरुणांना राग आला. त्यांनी विशालला जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. बघता बघता वाद वाढला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. अनिकेत, रोहन आणि त्यांच्या मित्रांनी चाकू, कोयते हाती घेत पिठले यांच्या कुटुंबावर हल्ला केला.
यात विशाल आणि रमेश दोघे गंभीर जखमी झाले. हा राडा कैलासनगर येथील भर रस्त्यावर झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, त्यांच्यात जुन्या वादातून हा राडा झाल्याचे जिन्सी पोलिस सांगत आहेत. जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.