बिडकीन : बिडकीन येथे बसस्थानक परिसरामध्ये बॅनरसमारे लावलेल्या बॅनरमुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात एका १७ वर्षीय युवकांचा मृत्यू झाला. तन्मय गणेश चोरमारे (रा. धनगर गल्ली, बिडकीन) असे मयत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी गावातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
बिडकीन ठाण्यात योगेश मारुती दाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा भाचा ऋत्विक धर्मे याने बसस्थानक परिसरामध्ये दीपावलीनिमित्त शुभेच्छांचे बॅनर लावले होते. मात्र, ऋत्विकने लावलेल्या बॅनरसमोरच २३ ऑक्टोबर रोजी ऋषिकेश उर्फ चिमण जाधव याने त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले. यातून ऋत्विक व चिमण यांची फोनवर बोलाचाली झाली. हा राग मनात धरून ऋषिकेश जाधव, राहुल ठाणगे, सागर ठाणगे, प्रदीप ठाणगे, संतोष ठाणगे व इतर ३० ते ३५ जणांनी गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ऋत्विक, तन्मय चोरमारे व इतर काही लोक गप्पा मारत बसले असताना त्यांना लोखंडी रॉड व लाठ्याकाट्यांनी मारहाण केली. यामध्ये तन्मय चोरमारे याच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्याचा शुक्रवारी (दि. २४) दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. दोन्ही गटांतील इतर किरकोळ जखमी आहेत.
दुपारनंतर बिडकीन बंद, तगडा बंदोबस्तशुक्रवारी दुपारी दोन वाजता खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तन्मय चोरमारे याचा मृत्यू झाल्याची बातमी गावात धडकली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी बिडकीन बाजारपेठ बंद केली. गावात तणाव निर्माण झाल्याने येथील सर्व चौकांत आणि बसस्थानक परिसरात दंगा काबू नियंत्रक पथक, स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
सीसीटीव्ही तपासून आरोपींची धरपकडतन्मयच्या मृत्यूनंतर नातेवाईक, नागरिक आक्रमक झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. सायंकाळनंतर बिडकीन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची धरपकड सुरू केली. पाच जण ताब्यात घेतले असले तरी इतर आरोपी फरार आहेत. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांची कार्यवाही सुरूच होती.
आईवर कोसळला दु:खाचा डोंगरदोन गटांतील ‘बॅनर वाॅर’ आणि वर्चस्ववादातून झालेल्या भांडणात १७ वर्षीय तन्मयचा मृत्यू झाला. तन्मयच्या लहानपणीच त्याचे वडील वारल्याने त्याची आई सोनाली चोरमारे या बिडकीन येथे माहेरी वास्तव्यास आल्या होत्या. त्यांना तन्मय व एक मुलगी आहे. मुलाच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Web Summary : A banner dispute in Bidkin turned violent, resulting in the death of 17-year-old Tanmay Chormare. Police have arrested five individuals and are investigating further. Tensions are high in the village, with increased security measures in place following the incident.
Web Summary : बिडकीन में बैनर विवाद हिंसक हो गया, जिसमें 17 वर्षीय तन्मय चोरमारे की मौत हो गई। पुलिस ने पांच लोगों को गिरफ्तार किया है और आगे की जांच कर रही है। घटना के बाद गांव में तनाव है, सुरक्षा बढ़ाई गई है।