भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे मित्र जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 19:10 IST2021-05-11T19:09:23+5:302021-05-11T19:10:46+5:30
Two friends death near Fullanbri in accident सिल्लोड येथून औरंगाबादला परतत असताना झाला अपघात

भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे मित्र जागीच ठार
फुलंब्री : सिल्लोड महामार्गावर टँकरची व दुचाकीची समोरासमोर टक्कर झाली. यात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी ३ वाजेदरम्यान घडला. शेख अस्लम शेख अहेमद ( २४ ) आणि सलीम पठाण रफिक पठाण अशी मृतांची नावे आहेत. दोघेही औरंगाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादेतील भावसिंगपुरा येथील रहिवासी शेख अस्लम शेख अहेमद आणि सलीम पठाण रफिक पठाण हे दोघे मंगळवारी सकाळी दुचाकीवरुन ( एमएच २० एफएफ ८७९४ ) सिल्लोड येथे कामानिमित्त आले होते. काम आटोपून परतत असताना फुलंब्रीनजीक समोरून येणाऱ्या भरधाव टँकरने ( एमएच १७ बी वाय -८७८७ ) त्यांना धडक दिली. यात जबर मार लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. शेख असलंम शेख अहेमद हा पेंटर होता तर सलीम पठाण हा रिक्षाचालक होता. दोघे चांगले मित्र होते. शेख अस्लम यास एक तर सलीम पठाणला दोन अपत्य आहेत.
दरम्यान, अपघात प्रकरणी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.