दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
By संतोष हिरेमठ | Updated: June 18, 2025 11:49 IST2025-06-18T11:49:16+5:302025-06-18T11:49:44+5:30
निपाणी फाटा येथे दोन ते तीन वाहने एकमेकांवर धडकले असल्याची माहिती, २५ प्रवासी जखमी

दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानकातून लातूरकडे निघालेल्या एसटी बसचा निपाणी फाट्याजवळ समोरच्या छत्रपती संभाजीनगर ते इचलकरंजीबसवर धडकून बुधवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. हा अपघात दुधाची कॅन रस्त्यावर पडल्याने दुधवाल्याने अचानक दुचाकी थांबवल्याने झाला. यात एक कार आणि दोन बस एकमेकांवर धडकल्याने मोठे नुकसान झाले.
सिडको बसस्थानक येथून सकाळी ८ वाजता लातूरसाठी बस निघाली. यावेळी बस पूर्ण भरलेली होती. ही बस निपाणी फाटा येथे पोहोचली. तेव्हा दुधाची कॅन रस्त्यावर पडल्याने दूधवाल्याने दुचाकी अचानक थांबवली. यामुळे पाठीमागील कारने ( एमएच ४६- एन १०३८ ) ब्रेक दाबले. हे पाहून त्यामागे असलेली छत्रपती संभाजीनगर - इचलकरंजी ( एमएच - ०९ - एफएल ७४३५) बसने देखील ब्रेक दाबले. यावेळी पाठीमागे असलेली छत्रपती संभाजीनगर - लातूर बस समोरच्या छत्रपती संभाजीनगर - इचलकरंजी बसवर धडकल्याचे प्रत्यक्षदर्शीं पाचोड बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक एस. एस. पठाडे यांनी सांगितले. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
दुचाकीवरील दूधवाला अपघातास कारणीभूत
धुळे - सोलापूर महामार्गावरील निपाणी फाटाजवळ दुचाकीवरील दुधाची कॅन रस्त्यावर पडल्याने दुधवाल्याने अचानक दुचाकी थांबवली. त्यामुळे पाठीमागील कारने ब्रेक दाबले. अचानक समोरची कार थांबल्याने पाठीमागील छत्रपती संभाजीनगर - इचलकरंजी बस कारवर धडकली. तर त्याच्या पाठीमागील छत्रपती संभाजीनगर - लातूर बस समोरच्या छत्रपती संभाजीनगर - इचलकरंजी बस वर धडकली. तीन वाहने एकमेकांवर धडकण्यास कारणीभूत दूधवाला मात्र तेथून पसार झाल्याची माहिती पाचोड बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक एस. एस. पठाडे यांनी दिली.
इतर प्रवाशांना अन्य बसमधून रवाना केले
वाहतूक नियंत्रक पठाडे हे पाठीमागील छत्रपती संभाजीनगर - उदगीर बसमधून प्रवास करत होते. पठाडे यांनी तत्काळ अपघातस्थळी उतरून मदतकार्य केले. रुग्णवाहिका, सिडको बसस्थानक, वाहतूक पोलिस यांना माहिती दिली. दोन्ही बसमधील तब्बल २५ प्रवासी जखमी झाले. इतर प्रवाशांना अन्य बस मधून पुढे रवाना करण्यात आल्याची माहिती पठाडे यांनी दिली.