दिवाळीच्या खरेदीस जाणाऱ्या दोघा भावांना भरधाव बसने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 16:46 IST2020-11-13T16:45:06+5:302020-11-13T16:46:30+5:30
दिवाळीसाठी नवीन कपडे खरेदी करण्यास सिल्लोड येथे जाताना अपघात

दिवाळीच्या खरेदीस जाणाऱ्या दोघा भावांना भरधाव बसने चिरडले
सिल्लोड: तालुक्यातील डोंगरगाव फाट्या जवळ भरधाव बसने समोरून येणाऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या भीषण अपघात बसखाली चिरडून दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कृष्णा अशोक पायघन, अक्षय सुरेश पायघन असे मृतांची नावे असून किरण संतोष बोडखे हा गंभीर जखमी आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी घडला असून मृत दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत.
तालुक्यातील राहिमाबाद येथील कृष्णा अशोक पायघन, अक्षय सुरेश पायघन हे दोघे भाऊ आणि किरण संतोष बोडखे यांना दिवाळीसाठी नवीन कपडे खरेदी करायचे होते. यासाठी शुक्रवारी दुपारी तिघेही एका दुचाकीवर सिल्लोडकडे येत होते. औरंगाबाद - जळगाव रोडवरून प्रवास करत असताना डोंगरगाव येथे त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव बसने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील कृष्णा आणि अक्षय हे दोघे चुलत भाऊ बसच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाले. तर किरण गंभीर जखमी झाला आहे. जखमीस अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पायघन परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळ्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.