जे सत्य ते समोर येईल, ईडीच्या फेऱ्यातून एकनाथ खडसेंची ‘रक्षा’ होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 13:42 IST2021-11-25T13:39:03+5:302021-11-25T13:42:24+5:30
MP Raksha Khadase : ईडीची चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणे बाहेर येत आहेत, आरोप होत आहेत. मात्र, जे सत्य असेल, ज्यात तथ्य असेल ते सगळे समोर येईल.

जे सत्य ते समोर येईल, ईडीच्या फेऱ्यातून एकनाथ खडसेंची ‘रक्षा’ होईल
औरंगाबाद : एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी) - (ED Raid ) अंमलबजावणी संचालनालयाच्या फेऱ्यात राष्ट्रवादीचे (NCP ) नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadase) अडकले आहेत. त्यांच्यावरील कारवाईबाबत जे सत्य आणि तथ्य असेल ते सर्व काही समोर येईल, असा विश्वास खासदार रक्षा खडसे ( MP Raksha Khadase ) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
उस्मानपुरा येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात खा. खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील महिला अत्याचारांत वाढ होण्यामागे महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भाजप टार्गेट करीत आहे, यावर त्यांची सून म्हणून आपल्याला काय वाटते, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, त्यांची सून म्हणून असा प्रश्न येईल असे वाटलेच होते. ईडीची चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणे बाहेर येत आहेत, आरोप होत आहेत. मात्र, जे सत्य असेल, ज्यात तथ्य असेल ते सगळे समोर येईल. खडसे हे माझे राजकीय गॉडफादर आहेतच, शिवाय त्यांच्यावर त्यांचे पक्षसंघटन वाढविण्याची जबाबदारी आहे. तशीच माझ्यावर देखील माझ्या पक्षाची जबाबदारी आहे. कुटुंबात वेगवेगळ्या पक्षांच्या जबाबदारीमुळे काहीही वाद होत नाहीत. कौटुंबिक वातावरणात राजकारण आणले जात नाही. एक वडील म्हणून ते सोबत आहेत. आमच्यातील कौटुंबिक संबंध दृढ आहेत.
दरम्यान, राज्यातील महिला अत्याचाराला सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करून त्यांनी राष्ट्रवादीचे शेख महेबूब यांचे प्रकरण दडपण्यात येत असल्याचे नमूद केले. शक्ती कायदा करण्यास सरकार विलंब करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी लता दलाल, सविता कुलकर्णी, माधुरी अदवंत, मनीषा मुंडे, बसवराज मंगरूळे, आदींची उपस्थिती होती.
मी भाजपातच
खडसे जेव्हा राष्ट्रवादीत गेले, त्यावेळी मी पूर्णवेळ भाजपातच राहणार असे जाहीर केले होते. आजही माझी तीच भूमिका असून, त्यावर मी ठाम आहे. राजकीय भूमिकेबाबत खडसे यांनी माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही, असा दावा खा. रक्षा यांनी केला.