छत्रपती संभाजीनगरजवळ ट्रक थेट दुचाकीवर चढला, मृत्यूला स्पर्श करून परतले बाप-लेक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 17:50 IST2025-12-18T17:49:37+5:302025-12-18T17:50:32+5:30
नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे जखमी युवती तत्काळ रुग्णालयात भरती

छत्रपती संभाजीनगरजवळ ट्रक थेट दुचाकीवर चढला, मृत्यूला स्पर्श करून परतले बाप-लेक!
वाळूज महानगर : लांजी रोडवर बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ट्रक व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात अरुण कदम (वय ५१) व त्यांची मुलगी अंजली अरुण कदम (वय १७, रा. दिशा वृंदावन सोसायटी, बजाजनगर) हे बाप-लेक दुचाकीवरून लांजीच्या दिशेने जात असताना मागून अचानक आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
धडकेनंतर ट्रक थेट दुचाकीवर चढल्याने दुचाकी ट्रकखाली अडकली. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच बाप-लेक दोघेही काही काळ ट्रकखाली सापडले होते. मात्र, प्रसंगावधान राखत घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तातडीने धाव घेतल्यामुळे अरुण कदम व त्यांची मुलगी अंजली हे दोघेही बालंबाल बचावले. अपघातानंतर ट्रक घटनास्थळीच सोडून चालकाने पळ काढला. नागरिकांनी मोठ्या मेहनतीने ट्रकखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढून रिक्षाने रुग्णालयात दाखल केले, तसेच अडकलेली दुचाकीही नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली.
अंजली कदम हिला गंभीर दुखापत झाली आहे. अरुण कदम यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. हा अपघात वाळूज पोलिस ठाण्याच्या अगदी बाजूलाच घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर काही काळ लांजी रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक (क्र. एमएच २० ईएल ९२३४) व दुचाकी (क्र. एमएच १५ बीएफ १३७६) ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात जमा केली आहे. फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.