कन्नड तहसील कार्यालयात कारवाईसाठी आणलेला हायवा ट्रक चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:35 IST2019-06-11T18:34:12+5:302019-06-11T18:35:40+5:30
यापूर्वीही या आवारात कारवाईसाठी उभ्या करण्यात आलेल्या दोन हायवा ट्रक चोरीस गेलेल्या आहेत.

कन्नड तहसील कार्यालयात कारवाईसाठी आणलेला हायवा ट्रक चोरीस
कन्नड (औरंगाबाद ) : उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात उभा केलेला हायवा ट्रक चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांचा तपास सुरु आहे.
अवैधरित्या गौण खनिज वाहतुक करतांना उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने एक हायवा ट्रक ( क्र. एमएच ०४ एच वाय ५५९८ ) पकडला होता. यानंतर पुढील कारवाईसाठी वाळूने भरलेला हा ट्रक पथकाने तहसील कार्यालयात आणला. रविवारी (दि. ९) सायंकाळी ६ ते सोमवारी (दि. १०) सकाळी १० वाजे दरम्यानच्या कालावधीत हा ट्रक चोरीस गेला. कार्यालयाच्या आवारात वाळू टाकून हा ट्रक चोरट्यांनी पळवला. कन्नड सजाचे तलाठी आशिष सुरपाम यांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहे कॉ. हुसेन पठाण करत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीही या आवारात कारवाईसाठी उभ्या करण्यात आलेल्या दोन हायवा ट्रक चोरीस गेलेल्या आहेत.