भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले, पत्नी बालंबाल बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 18:34 IST2021-12-16T18:31:59+5:302021-12-16T18:34:32+5:30
भीषण अपघातात ट्रकने पतीला चिरडले तर पत्नी बाजूला फेकल्या गेल्यामुळे बचावली

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले, पत्नी बालंबाल बचावली
सिल्लोड (औरंगाबाद ) : भरधाव वेगातील ट्रक चालकाने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना आज दुपारी शहरातील आंबेडकर चौकात घडली. पुंडलिक ठकुबा सुसर ( ५५, रा. मांडणा ) असे मृताचे नाव असून या भीषण अपघातात त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी जळगावकडून जालनाकडे जाणारा एक ट्रक ( एम एच ३२ आर जे ६११५ ) शहरातून भरधाव वेगाने जात होता. याचवेळी कामानिमित्त मांडणा येथून सिल्लोडकडे पुंडलिक सुसर पत्नी शोभाबाई यांच्यासोबत दुचाकीवरून ( एम. एच.२० एफएफ २३१० ) जात होते. आंबेडकर चौकात भरधाव ट्रकने सुसर यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. खाली कोसळलेल्या पुंडलिक सुसर यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी शोभाबाई बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाल्या.
सुसर शेती करत. तसेच सिल्लोडचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्या वाहनावर चालक म्हणून देखील काम करत असत. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.