चालकाची हत्या, आरोपी ट्रकमध्ये मृतदेह घेऊन २ दिवस फिरले; प्रेयसीला कॉल केला अन् अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:10 IST2025-01-24T15:06:08+5:302025-01-24T15:10:40+5:30
अडीच हजार किलो लाेखंड लुटण्यासाठी ट्रक व्यावसायिकाची हत्या, ग्राहक न मिळाल्याने ट्रक सोडून पसार; पोलिसांनी चोवीस तासांत तीन मारेकऱ्यांना केली अटक

चालकाची हत्या, आरोपी ट्रकमध्ये मृतदेह घेऊन २ दिवस फिरले; प्रेयसीला कॉल केला अन् अडकले
छत्रपती संभाजीनगर : ट्रक व्यावसायिक विजय मुरलीधर राऊत (५२, रा. केडगाव, अहिल्यानगर) यांची हत्या लुटमारीच्या उद्देशातूनच झाली. त्यांच्या परिचयाचा गणेश वसंत पवार याने मित्र गणेश गजानन कुटे (दोघेही रा. सुलतानपूर) व ज्ञानेश्वर गणेश घायाळ (रा. गायखेडा, लोणार) यांच्या मदतीने ही हत्या केली. स्थानिक गुन्हे शाखेने चोवीस तासांत हत्येचा उलगडा करत तिघांनाही अटक केली.
राऊत रायपूरला माल पोहोचविण्यासाठी गेले होते. १९ जानेवारी रोजी पुन्हा अडीच हजार किलो लोखंड घेऊन अहिल्यानगरसाठी निघाले. बुधवारी पहाटे मात्र आडगावमध्ये सोलापूर-धुळे महामार्गावर त्यांचा ट्रकच्या टुलबॉक्समध्ये मृतदेह आढळून आला. अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक पूजा नांगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुधीर मोटे, समाधान पवार, रवी लोखंडे, श्रीमंत भालेराव, लहू थोटे, नरेंद्र खंदारे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांचे पथक तत्काळ तपासासाठी रवाना झाले.
कर्जबाजारी, नशेसाठी पैसे पुरेना
बदली चालक असलेल्या पवार व राऊत यांची कामानिमित्ताने अनेकदा भेट होत असे. रायपूरमध्ये त्याने राऊत यांना जवळपास अडीच हजार किलो लोखंडाच्या ट्रान्सपोर्टचे काम मिळाल्याचे पाहिले. कर्जबाजारीपणा, नशेखोरीसाठी पैसे मिळत नसल्याने तेथेच त्याच्या डोक्यात लुटण्याचा कट शिजला.
रूम फ्रेशनर मारून ट्रक चालवला
रायपूरमध्येच पवारने राऊत यांना मेहकरपर्यंत सोडण्याची विनंती केली. सोमवारी सकाळी १० वाजता दोघांनी कारंजात नाष्टा केला. राऊत यांना आराम करण्यास सांगून त्याने स्टिअरिंग हाती घेतले. तासाभराने राऊत झोपले असतानाच त्याने टॉमीने डोके ठेचून हत्या केली. मेहकरपासून घायाळ व कुटे त्याला मिळाले. तेथे त्यांनी ३० हजारांत ३ क्विंटल सळ्या विकल्या. जालन्यात त्यांना प्रयत्न करूनही खरेदीदार भेटला नाही. गाडीत दुर्गंधी सुटल्याने रूम फ्रेशनर मारत शहरात येऊन ट्रक सोडून ते गावाकडे परतले.
प्रेयसीला कॉल केला अन् अडकला
प्रवासात पवारचा मोबाइल बंद पडला होता. राऊत यांची हत्या केल्यानंतर त्याने प्रेयसीला संपर्क करण्यासाठी तब्बल ११ वेळा कॉल केले. पोलिस तपासात ही बाब निष्पन्न होताच तपासाची चक्रे प्रथम सदर महिला व नंतर पवारच्या दिशेने फिरले. टोलनाक्याच्या फुटेजमध्येही पवार स्पष्टपणे कैद झाला होता.