सराफाला नकली मंगळसूत्र विकण्याचा चोराचा प्रयत्न

By Admin | Updated: November 27, 2014 01:09 IST2014-11-27T00:58:30+5:302014-11-27T01:09:16+5:30

औरंगाबाद : मला पैशांची गरज आहे, असे सांगून एका सराफाला सोन्याचे नकली मंगळसूत्र

Tropical attempt to sell counterfeit mangulasutra | सराफाला नकली मंगळसूत्र विकण्याचा चोराचा प्रयत्न

सराफाला नकली मंगळसूत्र विकण्याचा चोराचा प्रयत्न



औरंगाबाद : मला पैशांची गरज आहे, असे सांगून एका सराफाला सोन्याचे नकली मंगळसूत्र विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला मुकुंदवाडी पोलिसांनी काल रात्री गजानन मंदिर परिसरातील न्यू बाविस्कर ज्वेलर्समध्ये अटक केली.

गोरख रघुनाथ खळेकर (२६, रा. तिरुपतीनगर, गारखेडा परिसर), असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील अट्टल मंगळसूत्र चोर आहे. यापूर्वीही त्याला मंगळसूत्र चोऱ्यांच्या गुन्ह्यात अटक झालेली आहे.
कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, गणेश देवीदास बाविस्कर यांचे गजानन मंदिराजवळ न्यू बाविस्कर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते मंगळवारी सकाळी दुकानात बसलेले होते. त्यावेळी आरोपी गोरख दुकानात आला. ‘मला पैशांची गरज आहे. त्यामुळे माझ्या आईचे हे मंगळसूत्र विकायचे आहे,’ असे म्हणत त्याने एक मंगळसूत्र दिले. ते १२ ग्रॅम भरले. २५ हजार रुपयांत ते घेण्याची तयारी बाविस्कर यांनी दर्शविली. गोरखने होकार दिला; परंतु तितकी रक्कम दुकानात नसल्याने एक हजार रुपये आता देतो आणि उर्वरित २४ हजार रुपये रात्री येऊन घेऊन जा, असे बाविस्कर यांनी सांगितले. गोरख त्यालाही तयार झाला व हजार रुपये घेऊन निघून गेला.
त्यानंतर मंगळसूत्राबाबत बाविस्कर यांना संशय आला. त्यांनी त्याची तपासणी केली. तेव्हा ते नकली असल्याचे स्पष्ट झाले. लगेच बाविस्कर यांनी घटनेबाबत मुकुंदवाडी पोलिसांना माहिती कळविली.
लगेच जमादार बी.डी. जाधव, राजेश बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री त्या दुकानात सापळा रचला. सव्वानऊ वाजेच्या सुमारास आरोपी गोरख उर्वरित रक्कम घेण्यासाठी दुकानात आला. लगेच दुकानात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप मारून त्याला अटक केली. तेव्हा हा तर अट्टल गुन्हेगार गोरख असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. गोरखला यापूर्वी मोटारसायकल चोरी, मंगळसूत्र चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे. आता पुन्हा त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Web Title: Tropical attempt to sell counterfeit mangulasutra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.