सिल्लोडजवळ ट्रिपल सीट दुचाकीस्वारांना ट्रकने उडवले; एक जागीच ठार, दोघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 19:31 IST2025-08-06T19:30:59+5:302025-08-06T19:31:21+5:30
डिग्रस फाट्यावर अपघात, ट्रकचालक अजिंठा पोलिसांच्या ताब्यात

सिल्लोडजवळ ट्रिपल सीट दुचाकीस्वारांना ट्रकने उडवले; एक जागीच ठार, दोघे गंभीर
सिल्लोड : जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावार डिग्रस (पानस) फाट्यावर ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली, तर दुचाकीवरील इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी रात्री ८ वाजता झाला.
द्वारकाबाई रघुनाथ सोनवणे (वय ७५) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अजय त्र्यंबक सोनवणे (२२), संजीवनी विजय सोनवणे (१५, सर्व रा. डिग्रस) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गोळेगाव येथील रुग्णालयात उपचार घेऊन ते डिग्रसकडे घरी जात होते. फाट्यावर रस्ता ओलांडताना त्यांच्या दुचाकीला सिल्लोडकडून जळगावकडे जाणाऱ्या ट्रकने (एमपी- ०६, एचजी- ३११४) मागून जोरात धडक दिली. यात द्वारकाबाई उडून ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या. तर अजय व संजीवनी दूर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे जखमींवर उपचार सुरू आहेत. माहिती मिळल्यानंतर अजिंठा ठाण्याचे निरीक्षक अमोल ढाकणे, भागवत शेळके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
‘सीआरपीएफ’चा जवान सुटीवर अन् अपघात झाला
अपघातात गंभीर जखमी असलेले अजय हे १५ जानेवारी रोजी ‘सीआरपीएफ’मध्ये भरती झालेले असून त्यांची ट्रेनिंग सुरू आहे. २६ ऑगस्ट रोजी १५ दिवसांची सुटी घेऊन ते डिग्रस येथे आलेले आहे. संजीवनी ही त्याची चुलत बहीण आजारी असल्याने तिला व काकू द्वारकाबाईला घेऊन गोळेगाव येथील रुग्णालयात गेले होते. परत येताना अपघात झाला. अजय व त्यांची बहीण संजीवनी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संजीवनीच्या आई-वडिलांचे निधन झाले असून तिचा सांभाळ आजी द्वारकाबाई करत होत्या. अपघाता द्वारकाबाई ठार झाल्याने संजीवनी पोरक्या झाल्या आहेत.