आई, वडिलांसह १० वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याला तिहेरी जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 19:01 IST2024-12-06T19:01:27+5:302024-12-06T19:01:59+5:30

दंडाचे ४० हजार रुपये मृताच्या वारस मुलाला देण्याचेही आदेश

Triple life imprisonment for murdering a 10-year-old girl along with her mother and father | आई, वडिलांसह १० वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याला तिहेरी जन्मठेप

आई, वडिलांसह १० वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याला तिहेरी जन्मठेप

छत्रपती संभाजीनगर : घरात घुसून कुटुंबातील आई, वडील व १० वर्षांच्या मुलीची हत्या केल्याच्या आरोपाखाली सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी आरोपी अक्षय प्रकाश जाधव (२७, रा. माळवाडी, सोलनापूर शिवार, ता. पैठण) याला तिहेरी जन्मठेपेसह ४० हजार रुपये दंड गुरुवारी (दि. ५) ठोठावला. आरोपीला ठोठावलेल्या दंडाची रक्कम मृताच्या वारस मुलाला देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.

४ वर्षांपूर्वी पैठण तालुक्यातील जुने कावसान गावातील संभाजी ऊर्फ राजू नारायण नेवारे (३५), त्यांची पत्नी आश्विनी (३०) व मुलगी सायली (१०) यांची आरोपीने हत्या केली होती. राजूचा मुलगा सोहम (६) हा या घटनेत जखमी झाला होता. राजू यांच्या पुतणीवर आरोपी एकतर्फी प्रेम करीत होता. याची माहिती राजूला मिळाली. त्यामुळे आरोपी व त्याच्या कुटुंबीयांना दुसरीकडे राहण्यासाठी जावे लागले. आरोपीचा भाऊ अचानक बेपत्ता झाला. यामागे राजूचा हात असल्याचा संशय आरोपीला होता. राजूच्या पुतणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात आरोपी जामिनावर असताना २७ नोव्हेंबर २०२० रोजी त्याने राजूच्या पुतणीचा पाठलाग केला. यावरून राजू व आरोपी यांच्यात वाद झाला असता ‘तुला सोडणार नाही’ अशी धमकी आरोपीने दिली होती.

२८ नोव्हेंबर २०२० च्या मध्यरात्री आरोपी तलवार, सत्तुर आणि पेट्रोलची बाटली घेऊन राजूच्या घरात शिरला, त्याने झोपेत असलेल्या राजू, त्याची पत्नी, मुलगी आणि मुलावर तलवार व सत्तुरने वार केले. सोहमला जाग आली तो ‘अक्षयदादा आम्हाला मारू नको,’ अशा विनवण्या करीत राहिला; मात्र, निर्दयी आरोपीला त्याची दया आली नाही. याबाबत मृत संभाजी यांचे भाऊ पांडुरंग यांनी फिर्याद दिली होती.

आरोपीला तिहेरी जन्मठेप
खटल्याच्या सुनावणीवेळी साहाय्यक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ आणि मधुकर आहेर यांनी २६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी अक्षयला भादंवि कलम ३०२, ३०७ आणि ३२६ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये आणि आर्म ॲक्टच्या अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड ठोठावला. ॲड. शिरसाठ यांना ॲड. तेजस्विनी मोने आणि ॲड. दिलीप खंडागळे यांनी साहाय्य केले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार गुणावत यांनी काम पाहिले.

Web Title: Triple life imprisonment for murdering a 10-year-old girl along with her mother and father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.