‘समृद्धी’वर ट्रॅव्हल्स बंद; तब्बल १० तास ४० प्रवासी रस्त्यावरच, दोघे इंटरव्ह्यूला मुकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 19:22 IST2026-02-16T19:22:38+5:302026-02-16T19:22:57+5:30

प्रवाशांनी आरटीओ अधिकाऱ्यांकडे तक्रार करताच पर्यायी बस उपलब्ध करून देण्यात आली

Travels stopped on 'Samriddhi Mahamarga'; 40 passengers stranded on the road for 10 hours, two missed interviews | ‘समृद्धी’वर ट्रॅव्हल्स बंद; तब्बल १० तास ४० प्रवासी रस्त्यावरच, दोघे इंटरव्ह्यूला मुकले

‘समृद्धी’वर ट्रॅव्हल्स बंद; तब्बल १० तास ४० प्रवासी रस्त्यावरच, दोघे इंटरव्ह्यूला मुकले

छत्रपती संभाजीनगर : नागपूरहून मुंबईला जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस शुक्रवारी रात्री २ वाजेच्या सुमारास हर्सूल टोलनाक्याजवळ बंद पडली; पण ट्रॅव्हलमालकाने वेळीच पर्यायी बस देण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ४० प्रवाशांना तब्बल १० तास रस्त्यावरच ताटकळावे लागले. अखेर प्रवाशांनी आरटीओ अधिकाऱ्यांकडे तक्रार करताच शनिवारी दुपारी १२ वाजता पर्यायी बस उपलब्ध करून देण्यात आली.

नागपूरहून मुंबईकडे जाणारी संजय ट्रॅव्हल्सची बस (एमएच- ४०, सीटी- ४१७७) समृद्धी महामार्गावरील सावंगी टोलनाक्याच्या पुढे बंद पडली. चालकाने बस रस्त्याच्या कडेला आणून उभी करून मालकाला कळविले; परंतु मालकाने दुसरी बस उपलब्ध नसल्याचे सांगितले. उपलब्ध होईल तेव्हा बस येईल, असे सांगून मालकाने फोन बंद करून टाकला, असे प्रवाशांनी सांगितले. आता येईल, थोड्या वेळाने येईल; असे करत पहाट झाली तरीही बस आलीच नाही. त्यामुळे प्रवासी जाम वैतागले. अखेर सकाळी १० वाजता प्रवाशांनी या घटनेची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांना दिली. काठोळे यांनी तातडीने भरारी पथकातील सहायक मोटार वाहन निरीक्षक नम्रता शिंदे यांना घटनास्थळी पाठविले. शिंदे यांनी प्रवाशांसाठी तातडीने पाण्याच्या बाटल्या, चहा व नाश्त्याची व्यवस्था केली; तसेच ट्रॅव्हल्स मालकाला पर्यायी बस तत्काळ उपलब्ध करून न दिल्यास कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर मालकाने दुपारी १२ वाजता बस पाठवली. बस आल्यानंतर प्रवासी पुढे रवाना झाले.

मुलाखत हुकली, परवाना रद्द करणार
या बसमधून प्रवास करणाऱ्या दोघांच्या मुंबईत मुलाखती होत्या; परंतु बस बंद पडल्याने मुलाखत हुकली. दरम्यान, या प्रकारानंतर संबंधित ट्रॅव्हल्समालकावर परमिट रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Web Title : 'समृद्धि' पर यात्राएँ रुकीं; 40 फंसे, दो साक्षात्कार से चूके।

Web Summary : संभाजीनगर के पास एक निजी बस खराब हो गई, जिससे 40 यात्री 10 घंटे तक फंसे रहे। दो यात्रियों के महत्वपूर्ण साक्षात्कार छूट गए। आरटीओ के हस्तक्षेप से एक प्रतिस्थापन बस मिली, और यात्रा मालिक के खिलाफ कार्रवाई की उम्मीद है।

Web Title : Travels halted on 'Samruddhi'; 40 stranded, two miss interviews.

Web Summary : A private bus broke down near Sambhajinagar, leaving 40 passengers stranded for 10 hours. Two passengers missed crucial interviews. RTO intervention led to a replacement bus, and action against the travel owner is expected.