एसटीने प्रवास करताय? मोठ्या प्रमाणावर बस निवडणुकीत, अनेक मार्गांवरील फेऱ्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 20:00 IST2026-02-06T19:59:27+5:302026-02-06T20:00:15+5:30
लालपरीतून प्रवास करण्यापूर्वी बस आहे की नाही, याची चौकशी केलेली बरी.

एसटीने प्रवास करताय? मोठ्या प्रमाणावर बस निवडणुकीत, अनेक मार्गांवरील फेऱ्या रद्द
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक कामांसाठी शुक्रवारी आणि शनिवारी एसटी महामंडळाच्या तब्बल २४४ एसटी जाणार आहेत. परिणामी, या दोन दिवशी अनेक मार्गांवरील बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे या दोन दिवशी लालपरीतून प्रवास करण्यापूर्वी बस आहे की नाही, याची चौकशी केलेली बरी.
जिप व पंस सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान आहे. शुक्रवारी मतदानाचे साहित्य, कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी आणि शनिवारी मतदानानंतर साहित्य मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी एसटी बसचा वापर होणार आहे. या दोन दिवशी २४४ एसटी पाठविण्यात येणार आहेत. परिणामी, विविध मार्गांवरील बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. बस फेऱ्या रद्द करताना कमी उत्पन्न असणाऱ्या फेऱ्या रद्द करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याबरोबर शालेय फेऱ्या, ग्रामीण फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.
या मार्गांवरील फेऱ्या रद्द
सोलापूर, अकोला, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, कलबुर्गी या लांब पल्ल्यांच्या काही फेऱ्यांसह सिल्लोड, कन्नड, वैजापूरसह ग्रामीण भागांतील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे, नाशिक सुरळीत
पुणे, नाशिक मार्गावरील बससेवा सुरळीत राहणार असल्याचे संतोष घाणे यांनी सांगितले. आजघडीला पुणे मार्गावर ई - बस धावत आहेत.