प्रवास होणार सुखकर! दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांना ३५ ई-बसची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:35 IST2025-09-06T13:32:19+5:302025-09-06T13:35:01+5:30

जाधववाडी बस डेपोत चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात

Travel will be comfortable! Chhatrapati Sambhajinagar city residents will receive 35 e-buses before Diwali | प्रवास होणार सुखकर! दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांना ३५ ई-बसची भेट

प्रवास होणार सुखकर! दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांना ३५ ई-बसची भेट

छत्रपती संभाजीनगर : जाधववाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागील भागात स्मार्ट सिटी आणि मनपा प्रशासनाने भव्य बस डेपो उभारला असून, येथे दिवाळीपूर्वी ३५ ई-बस दाखल होणार आहेत. बससाठी चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून, गुरुवारी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी संपूर्ण कामाची पाहणी केली. केंद्र शासनाच्या माध्यमातून शहराला १०० बस उपलब्ध होणार आहेत. त्यातील पहिला टप्पा दिवाळीत पूर्ण होईल.

स्मार्ट सिटीने २०१८ मध्ये शहर बससेवा सुरू केली. १०० डिझेल बस ३५ कोटी रुपये खर्च करून खरेदी केल्या. बससाठी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बस डेपो उभारण्यात आला. येथेच शहरात धावणाऱ्या बसची दुरुस्ती व साफसफाई आदी कामे केली जातात.

याच बस डेपोच्या आवारात ई-बससाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी आहे. जी. श्रीकांत यांनी गुरुवारी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य अधिकारी संजय सुपेकर उपस्थित होते. चार्जिंग स्टेशनसाठी हर्सूल येथील वीज उपकेंद्रापासून बस डेपोपर्यंत एचटी लाइन महावितरणने टाकली आहे. या ठिकाणी उपकेंद्र उभारले जाणार आहे. सोबतच चार्जिंग स्टेशनचे काम देखील होणार आहे. एकाच वेळी १६ बसची चार्जिंग करता येईल. एकदा चार्ज केलेली बस २७० किलोमीटर चालते असा दावा खासगी कंपनीने केला आहे; पण शहरातून ही बस १५० किलोमीटर चालेल असे गृहीत धरण्यात येत आहे. दुपारच्या सत्रात बस चार्ज करण्यासाठी सिडको वाळूज परिसरात एक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.

खासगी कंपनी चालविणार बस
हैदराबाद येथील एका खासगी कंपनीची केंद्र शासनाने बससेवेसाठी नेमणूक केली आहे. चालक आणि बस त्यांच्याच मालकीची राहील. वाहक स्मार्ट सिटीला नेमावा लागेल. दिवाळीपूर्वी या बस शहरात धावणार आहेत. नऊ आणि बारा मीटर लांब अशा दोन प्रकारच्या बस असतील. एका किलोमीटरमागे ६४ रुपये कंपनीला द्यावे लागतील. सध्या एक ई-बस शहरात धावत असून, तिला चांगला प्रतिसाद आहे.

Web Title: Travel will be comfortable! Chhatrapati Sambhajinagar city residents will receive 35 e-buses before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.