छत्रपती संभाजीनगरात वाहतूक कोंडी फुटणार; डझनभर उड्डाणपुल, दोन भुयारी मार्गांचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:00 IST2025-10-17T16:55:34+5:302025-10-17T17:00:02+5:30
२ महिने अभ्यास करुन पालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीने प्राथमिक स्तरावरील डीपीआर तयार केला.

छत्रपती संभाजीनगरात वाहतूक कोंडी फुटणार; डझनभर उड्डाणपुल, दोन भुयारी मार्गांचा प्रस्ताव
छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्ते विकासाबद्दल गुरुवारी ‘स्मार्ट सिटी’ कार्यालयात सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात शहरात नव्याने बारा उड्डाणपूल आणि दोन भुयारी मार्ग तयार करणे गरजेचे आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे. महावीर चौक ते पडेगाव दरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाची शिफारस करण्यात आली आहे. रस्ते विकासाच्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो शासनाला सादर केला जाणार आहे.
विकास योजनेनुसार रस्ता रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने प्रमुख ५ रस्त्यांवर पाडापाडी केली . त्यात पडेगाव - मिटमिटा रस्ता, पैठण रस्ता, महानुभाव आश्रम ते झाल्टा फाटा हा बीड बायपास रस्ता, जालना रोड, जळगाव रोड या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांचा परिपूर्ण विकास करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली. त्यानंतर पालिकेने पेडेको या एजन्सीची नियुक्ती केली. या एजन्सीने २ महिन्यांपासून अभ्यास करुन प्राथमिक स्तरावरील डीपीआर तयार केला.
‘पेडेको’ चे प्रतिनिधी विजय पवार यांनी केलेल्या सादरीकरणानुसार महावीर चौक ते पडेगाव दरम्यान डबलडेकर उड्डाणपूल करणे गरजेचे आहे. नगरनाका ते दौलताबाद टी पॉइंट या ८ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सैन्यदलाच्या कार्यालयासाठी भुयारी मार्गाची शिफारस करण्यात आली.
जालना रोडवर ३ उड्डाणपूल
जालना रोडवर सध्या ४ ठिकाणी उड्डाणपूल आहेत. त्यात आणखी ३ उड्डाणपुलांची शिफारस पेडेकोने केली आहे. यात हायकोर्टच्या सिग्नलजवळ, मुकुंदवाडी चौक आणि धूत हॉस्पिटल ते सुखना नदीचा पूल या ३ ठिकाणी उड्डाणपूल उभारावे, असे नमूद केले.
बीड बायपासवर आणखी ३ पूल
बीड बायपास रस्त्यावर सध्या ३ ठिकाणी उड्डाणपूल अस्तित्वात आहेत. त्यासोबतच आणखी ३ ठिकाणी पेडेकोने उड्डाणपूल उभारण्याबाबत शिफारस केली आहे.
जळगाव रोडवर ३ पूल
जळगाव रोडवर गरवारे कंपनी, डॉ. आंबेडकर चौक आणि अहिल्यादेवी होळकर चौक या ३ ठिकाणी उड्डाणपूल करण्याची शिफारस पेडेकोने केली आहे.
पैठण रोडवर डबलडेकर पूल
पैठण रोडवर सध्या अस्तित्वात असलेला रेल्वेस्टेशनचा उड्डाणपुल महानुभाव आश्रमपर्यंत वाढविण्यात यावा. तर नक्षत्रवाडी ते बिडकीनदरम्यान डबल डेकर उड्डाणपूल तयार करावा.
नगरनाका ते पडेगाव उड्डाणपूल असावा ६ लेनचा
महावीर चौक ते पडेगावदरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाची तर नगरनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या सैन्य दलाचे मैदान, कार्यालय, कॅन्टीनसाठी भुयारी मार्ग टाकण्याची शिफारस केली आहे. शिवाय, नगरनाका ते पडेगाव हा उड्डाणपूल ६ लेनचा असावा, असेही नमूद केले.
२ महिने
अभ्यास करुन पालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीने प्राथमिक स्तरावरील डीपीआर तयार केला.