अडत व्यवहार पुन्हा बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:20 IST2018-04-04T00:47:12+5:302018-04-04T15:20:43+5:30

मराठवाड्यातील सर्व कृउबामध्ये ई-नाम लागू करा, मगच जाधववाडीत ई-हर्राशी होईल, तोपर्यंत अडत व्यवहार बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी घेतला. यामुळे मंगळवारी अडत व्यवहार पूर्णपणे बंद होते.

The trade again stopped in Jadhavwadi Mondha | अडत व्यवहार पुन्हा बेमुदत बंद

अडत व्यवहार पुन्हा बेमुदत बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील २२ दिवसांपासून राष्ट्रीय कृषी बाजार ‘ई-नाम’ योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, यात शेतीमाल विकल्यावर रोख रक्कम मिळत नसल्याने शेतकरी अन्य कृउबामध्ये जाऊन माल विकत आहेत. या योजनेत अनेक त्रुटी असून, मराठवाड्यातील सर्व कृउबामध्ये ई-नाम लागू करा, मगच जाधववाडीत ई-हर्राशी होईल, तोपर्यंत अडत व्यवहार बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी घेतला. यामुळे मंगळवारी अडत व्यवहार पूर्णपणे बंद होते. मात्र, परपेठेतील शेतीमाल व होलसेल व्यवहार सुरू होते.
शेतक-यांच्या शेतीमालास जास्त भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने देशातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्यात पहिल्या टप्प्यात औरंगाबादेतील कृउबाचा समावेश करण्यात आला. मागील २२ दिवसांपासून येथील जाधववाडीत धान्य खरेदी-विक्रीची ‘ई-नाम’ योजना सुरू आहे. बाजार समितींतर्गत ‘ई-हर्राशी’ केली जात आहे. १२ मार्चपासून शेतक-यांनी आणलेला सर्व शेतीमाल सेल हॉल क्र. २ येथे उतरवून घेतला जात होता व ‘ई-हर्राशी’ करण्यात येत होती. आठ दिवसांनंतर अडत्याच्या दुकानासमोर ‘ई-हर्राशी’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे काही दिवस ‘ई-हर्राशी’ झाली. मात्र, शेतकरी रोख रक्कम मागत असल्याचे अडत्यांचे म्हणणे आहे. तसेच हर्राशीसाठी अवघ्या दीड मिनिटाचा वेळ देण्यात आला तोही अपुरा आहे, असेही अडत्यांनी सांगितले. तसेच ई-नाम पोर्टलवर ई-हर्राशीला उशीर लागत असून, दररोज १५० ते २०० पोत्यांचीच हर्राशी होत असल्याचा आरोप अडत्यांनी केला. यासंदर्भात अडत असोसिएशनच्या वतीने बाजार समितीचे सभापती व सचिवांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, शेतकरी जालना, लासूर स्टेशन आदी कृउबामध्ये ‘ई-नाम’ सुरू नसल्याने तिकडे शेतीमाल घेऊन जात आहेत. याचा मोठा फटका जाधववाडीतील आवकीला बसला आहे. जोपर्यंत अन्य कृउबामध्ये ई-नाम सुरू होत नाही तोपर्यंत अडत व्यवहार बंद ठेवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यामुळे दिवसभरात अडत व्यवहार झालेच नाहीत.
शेंद्र्यातील शेतकरी गणेश काकडे यांनी ट्रॅक्टरमध्ये १०० पोती ज्वारी विक्रीसाठी आणली होती. मात्र, जाधववाडीत आल्यावर येथे अडत्यांचा बंद असल्याचे त्यांना कळले. ज्वारी उतरवून घेण्यास अडते व बाजार समितीनेही नकार दिला. यामुळे संतापलेल्या काकडे यांनी सांगितले की, बेमुदत बंद असल्याची शेतक-यांना पूर्वसूचना देणे आवश्यक होते. आता ट्रॅक्टरचे भाडे कोण देणार, असा सवालही त्यांनी विचारला.
अडत्यांचे परवाने
रद्द करणार
‘ई-नाम’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ती शेतक-यांच्या फायद्याची आहे. मात्र, अडत व्यापारी सतत व्यवहार बंद ठेवून अंमलबजावणीत अडथळे आणत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ बंद ठेवता येत नाही. अडत्यांनी कितीही विरोध केला तरीही ‘ई-नाम’ योजनेनुसारच आता बाजार समितीमध्ये धान्याचे व्यवहार होणार आहेत. अडत्यांनी शेतकºयांची अडवणूक करू नये व आपले व्यवहार सुरू करावेत, नसता अडत्यांचे परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई बाजार समितीला करावी लागेल.
-राधाकिसन पठाडे
सभापती, जाधववाडी बाजार समिती

Web Title: The trade again stopped in Jadhavwadi Mondha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.