'ट्रॅक्टर धुवायला गेले, पण खदानीत बुडाले'; एकाच कुटुंबातील तीन मुलांसह चौघांचा मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:43 IST2025-10-03T12:42:10+5:302025-10-03T12:43:20+5:30
गंगापूर तालुक्यातील घटना; आई-वडिलांनी फोडला हंबरडा, अख्खं गाव सुन्न!

'ट्रॅक्टर धुवायला गेले, पण खदानीत बुडाले'; एकाच कुटुंबातील तीन मुलांसह चौघांचा मृत्यू!
लिंबेजळगाव/वाळूज : ट्रॅक्टर धुण्यासाठी खदानीत गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथे गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. इरफान इसाक शेख (१७), इम्रान इसाक शेख (वय १३), झैन हयात पठाण (वय ९) व व्यंकटेश उर्फ गौरव दत्तू तारक (वय ९, सर्व रा. लिंबे जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. मयतांमध्ये दोन सख्खे भाऊ व एक आतेभाऊ असे एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.
लिंबे जळगाव शिवारात गट नंबर १७६ मध्ये जाहेद रसूल पठाण यांची जवळपास सहा एकर शेत जमीन आहे. याच ठिकाणी त्यांचे दोन मजली घर असून त्यांची तीन मुले व मुलगी जावई असे सर्व कुटुंब येथेच राहतात. तर त्यांच्या शेजारी गट नंबर १३४ मध्ये दत्तू तारक हे कुटुंबीयासह राहतात. गुरुवारी सकाळी दहा वाजता त्यांचा नातू इरफान इसाक शेख हा ट्रॅक्टर धुण्यासाठी जाताना त्यांच्यासोबत त्याचा लहान भाऊ इमरान, मामाचा मुलगा झैन व शेजारील दत्तू तारक यांचा मुलगा व्यंकटेश उर्फ गौरव हे असे तिघेही ट्रॅक्टरमध्ये बसून गाव शिवारातील गट नं. १७७ मध्ये मुरूम उत्खनामुळे तयार झालेल्या खदानीत गेले.
इकडे आजोबा जाहेद पठाण हे दीड दोन तास झाले तरी मुले परत आली नाहीत, म्हणून मुलांना पाहण्यासाठी ट्रॅक्टर उभे असल्या ठिकाणी गेले; मात्र तिथे त्यांना कोणीच दिसून आले नाही. त्यांनी त्यांचा शोध घेतला; परंतु ते सापडले नाहीत. त्यानंतर त्यांनी त्यांची तिन्ही मुले व जावई यांना घटनास्थळी बोलावून घेतले. यावेळी या सर्वांनी शोध घेतला असता एकापाठोपाठ त्यांना तिघांचे मृतदेह हाती लागले तर मोठा इरफान हा तासभर शोध घेतल्यानंतर मिळून आला. तोपर्यंत अनेक जण घटनास्थळी दाखल झाले होते. चारही जणांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे घाटीत दाखल करण्यात आले. तेथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
शाळेला सुटी असल्याने गेले होते ट्रॅक्टर धुण्यासाठी
मयत इरफान शेख हा १७ वर्षाचा असून तो वडील आणि मामांना शेतीत सहकार्य करतो. तसेच लहान भाऊ इमरान हा लिंबे जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीला शिकतो. लहान झैन हा भवानी वस्ती शाळेत इयत्ता चौथीत तर व्यंकटेश उर्फ गौरव हा जिल्हा परिषद शाळेत चौथीलाच आहे. गुरुवारी दसऱ्यानिमित्त शाळेला सुटी होती. त्यामुळे हे सर्वजण इरफान सोबत ट्रॅक्टर धुण्यासाठी खदानीत गेले होते.