टायर फुटल्याने ऊसतोड मजुरांचे टॅक्टर ट्रॉलीसह पुलावरुन कोसळले ; १ ठार ८ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 12:13 IST2021-02-06T12:02:05+5:302021-02-06T12:13:43+5:30
The tractor accident at Khamb river bridge : मुक्तेश्वर साखर कारखान्यात ऊसतोड मजुराचे कुटुंबीय लांझी शिवारात वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सायंकाळी हे उसतोड मजुर ट्रॅक्टरमधून घरी जात होते.

टायर फुटल्याने ऊसतोड मजुरांचे टॅक्टर ट्रॉलीसह पुलावरुन कोसळले ; १ ठार ८ जखमी
वाळूज महानगर : ऊसतोड मुजरांना घेऊन जाणा-या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने ट्रॉलीसह ट्रॅक्टर पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे. तर ८ जण जखमी झाले असून, यात २ बालकांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी (दि.५) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लांझीजवळ घडली. संदीप दिलीप घोरपडे (३० रा.कचनेर) असे मृताचे नाव आहे. तर अर्चना प्रभाकर शरणागत (२५), प्रभाकर रामनाथ घोरपडे (३०), शिवनाथ रामनाथ शरणागत (२५), मिनाबाई प्रभाकर शरणागत (३०), स्वराज शिवनाथ शरणागत, कानिफनाथ शरणागत, सुहानी संदीप घोरपडे हे ७ तर साहिल शिवनाथ शरणागत (६), कल्याणी प्रभाकर शरणागत (८) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मुक्तेश्वर साखर कारखान्यात ऊसतोड मजुराचे कुटुंबीय लांझी शिवारात वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सायंकाळी हे उसतोड मजुर ट्रॅक्टरमधून घरी जात होते. वाळूज-ब्रह्मगव्हाण या एमआयडीसीच्या रस्त्यावरुन वस्तीकडे येत असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लांझीलगतच्या खामनदी पुलावर टायर फुटल्याने चालक प्रभाकर शरणागत याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रॉलीसह टॅक्टर खामनदीच्या पुलावरुन जवळपास ३० फुट खाली कोसळले. मात्र पुलाच्या फटीमध्ये ट्रॉली अडकल्याने प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरमधील मुजरांनी दोघा-तिघांना बाहेर फेकले. काही वेळातच टॅक्टर ट्रॉलीसह नदीपात्रात कोसळल्याने चालकसह ट्रॅक्टरमधील उसतोड मजूर खाली पडून गंभीर जखमी झाले. नारायणपूरचे माजी सरपंच नासेर पटेल, वजीर पटेल, उपनिरीक्षक लक्षमण उंबरे, पोहेकॉ. पांडूरंग शेळके आदींनी जखमींना मदत केली. यानंतर १०८ रुग्णवाहिकेतुन गंभीर जखमी मजुरांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जळतण जमा करणाऱ्या दाम्पत्याची मदत
नदीपात्रालगत जळतणासाठी लाकडे गोळा करणाºया अंबादास अशोक सोनवणे व त्यांची पत्नी सुवर्णा यांनी मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमींना या दाम्पत्याने दिलासा देत मदतीसाठी आरडा-ओरडा केला. यानंतर रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारक व लगतच्या शेतकºयांनी मदतीसाठी धाव घेतली. यानंतर सर्व जखमींना पोलिसांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.