पर्यटकांच्या गाईडची उठबस गुन्हेगार, ड्रग्ज तस्करांत ! लुटताना रंगेहाथ सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 12:09 IST2025-09-09T12:07:50+5:302025-09-09T12:09:46+5:30

हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारासोबत गाईडने तरुणाला लुटले

Tourist guide turns out to be a criminal, drug smuggler! Caught red-handed while robbing | पर्यटकांच्या गाईडची उठबस गुन्हेगार, ड्रग्ज तस्करांत ! लुटताना रंगेहाथ सापडला

पर्यटकांच्या गाईडची उठबस गुन्हेगार, ड्रग्ज तस्करांत ! लुटताना रंगेहाथ सापडला

छत्रपती संभाजीनगर : पर्यटनाची राजधानी असलेल्या शहराचा पर्यटकांना इतिहास सांगणाऱ्या गाईडची कुख्यात गुन्हेगार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांमध्ये उठबस असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारासोबत त्याने एका तरुणाला चाकू लावून लुटण्याचा प्रयत्न केला. शनिवारी मध्यरात्री मिलकॉर्नर ते जुबिली पार्क रस्त्यावर ही घटना घडली. अरबाज खान वाहेद खान (२४, रा. कोहिनूर कॉलनी, मोगलपुरा) व मोहम्मद आवेज मोहम्मद रऊफ (३०, रा. पडेगाव) अशी आरोपींची नावे असून, यातील आवेज हा गाईड आहे.

चेतन फोलाने (२२, रा. बेगमपुरा) हा शनिवारी गणपती पाहण्यासाठी गेला होता. रात्री १२.१५ वाजता मिलकॉर्नर परिसरात एक रिक्षाचालक व त्याच्या सहकाऱ्याने त्याला अडवून चाकू हल्ल्याचा प्रयत्न करत खिशातील मोबाइल हिसकावला. त्यानंतर त्याला रिक्षात टाकण्याचा प्रयत्न सुरू असताना चेतनचा आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी धाव घेत लुटारूंना पकडून पोलिसांकडे सोपवले. बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करून उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर यांनी दोघांना अटक केली.

अरबाज हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर, आवेज गाईड
अरबाजवर छावणी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल असून, २०२३ मध्ये त्याला एनडीपीएस पथकाने अमली पदार्थांच्या विक्रीत अटक केली होती. दोन्ही गुन्ह्यात तो जामिनावर सुटला आहे. आवेज हा पानचक्की येथे गाईड आहे. विदेशी पर्यटक येत असलेल्या शहरात रिक्षाचालक, गाईडच गुन्हेगारी करत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

बँक अधिकाऱ्याला भरदिवसा लुटले
अन्य घटनेत बँक अधिकारी असलेले अभिजित हिवराळे (रा. जटवाडा परिसर) यांनाही एका रिक्षाचालकासह अन्य दोघांनी भरदिवसा लुटले. ७ सप्टेंबर रोजी त्यांची आयऑन सेंटर येथे परीक्षा होती. दुपारी ३.३० वाजता परीक्षा संपल्यानंतर ते धूत रुग्णालयासमोर उभे होते. तेथे अचानक तिघांनी हल्ला चढवत त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान पोलिस दिसताच लुटारूंनी पळण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिकांनी त्यांना पकडले. यात रिक्षाचालक विनीत रमेश घोडके (२९), सौरभ दिलीप घोडके (२४, दोघे रा. छावणी) व प्रदीप साहेबराव साळवे (३९, रा. भीमनगर) यांना अटक करण्यात आल्याचे सहायक निरीक्षक कैलास लहाने यांनी सांगितले.

Web Title: Tourist guide turns out to be a criminal, drug smuggler! Caught red-handed while robbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.