अवैध सावकारी गुंडांचा छळ, छत्रपती संभाजीनगरात तरुण व्यावसायिकाने संवपले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:55 IST2025-09-12T16:50:20+5:302025-09-12T16:55:01+5:30
सावकारी छळ जीवावर बेतला! घरापर्यंत पोहोचून धमक्या देण्यापर्यंत मजल, उत्तरानगरीत धक्कादायक घटना

अवैध सावकारी गुंडांचा छळ, छत्रपती संभाजीनगरात तरुण व्यावसायिकाने संवपले जीवन
छत्रपती संभाजीनगर : किरकोळ पैशांच्या व्यवहारातून दोन अवैध सावकारी गुंडांचा छळ, धमक्यांना कंटाळून एका तरुण व्यावसायिकाने गळफास घेत आत्महत्या केली. प्रतीक चंद्रकांत देशमुख (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना उघडकीस आली.
प्रतीक कुटुंबासह उत्तरानगरी परिसरात राहत होते. त्यांच्या वडिलांचा गारमेंटचा मोठा व्यवसाय आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रतीक वडिलांचाच व्यवसाय सांभाळत होते. गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या व्यवहारातून त्यांना काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्रास देत होते. त्यामुळे प्रतीक तणावाखाली होते. हे गुंड प्रतीक यांना भेटून सातत्याने दबाव टाकून धमकावत होते. त्यांचे पैसे परत करूनही पन्नासपट अधिक परताव्याची मागणी करून त्रास देत होते. गेल्या तीन दिवसांपासून प्रतीक अधिक तणावाखाली गेले. त्यामुळे वडिलांनी त्यांना विश्वासात घेतल्यावर त्यांनी ही बाब त्यांना सांगितली.
वडिलांनी समजून सांगितले
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यांच्याकडून ही बाब समजल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना धीर दिला. या गुंडांना संपर्क करून वाद मिटवण्यासाठी पुढाकार देखील घेतला. तरीही या गुंडांच्या वागण्यात बदल झाला नाही. गुरुवारी दुपारी दोघांनी त्यांचे घर गाठत पार्किंगमध्ये प्रतीक यांना पुन्हा धमकावले. त्यामुळे तणावग्रस्त प्रतीक यांनी घराच्या वरच्या मजल्यावर जात गळफास घेतला. बराच वेळ होऊनही प्रतीक प्रतिसाद देत नव्हते. कॉलला प्रतिसाद देणे बंद केल्याने वडिलांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडल्यानंतर प्रतीक लटकलेल्या अवस्थेत आढळले. प्रतीक घरात वडील बंधू होते. त्यांना दोन लहान बहिणी आहेत.
दोन दोन तास कॉलवर संभाषण
प्रतीक यांना गुंड सतत कॉल करून धमकावत होते. नातेवाइकांच्या माहितीनुसार, त्यांच्या मोबाईलमध्ये दोन दोन तासांचे कॉल आढळून आले. आम्ही याबाबत पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे प्रतीक यांच्या मामांनी सांगितले.